गिर्यारोहिका शर्विकाने सहाव्या वर्षी १०० किल्ले सर करत रचला विक्रम

‘शतक गडकिल्ल्यांचे’ मोहिमेच्या माध्यमातून कौतुकास्पद कामगिरी

गिर्यारोहिका शर्विकाने सहाव्या वर्षी १०० किल्ले सर करत रचला विक्रम

रायगड जिल्ह्यामधील अलिबाग तालुक्यातील एका सहा वर्षीय गिर्यारोहिकेने एक नवा विक्रम आपल्या नावे केला असून महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे. प्रसिद्ध बाल गिर्यारोहिका शर्विका जितेन म्हात्रे हिने वयाच्या सहाव्या वर्षी १०० किल्ले सर करत विक्रम रचला आहे. ‘शतक गडकिल्ल्यांचे’ या मोहिमेच्या माध्यमातून तिने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

बाल गिर्यारोहिका शर्विका जितेन म्हात्रे हिने एक अद्भूत कामगिरी करून संपूर्ण महाराष्ट्राचे नाव देशात उंचावले आहे. ‘शतक गडकिल्ल्यांचे’ या तिच्या गेल्या साडेतीन वर्षापासून सुरू असलेल्या मोहिमेतून तिने शेवटचा म्हणजेच १०० वा कठीण श्रेणीतील जीवधन किल्ला सर केला. वयाच्या सहाव्या वर्षी तिने तब्बल १०० गडकिल्ले पायथ्यापासून सर करून एक नवा विक्रम प्रस्थापित करून आजच्या तरुणाईत एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

गेल्या साडे तीन वर्षापासून शर्विका हिची मोहीम सुरू होती. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता तिने महाराष्ट्रातील रायगड, पालघर, पुणे, नाशिक, ठाणे, नगर या जिल्ह्यातील तब्बल १०० गिरीदुर्ग सर केले आहेत. विशेष म्हणजे तिने प्रत्येक गडाच्या पायथ्याच्या पवित्र मातीचा संग्रह केला आहे. ही माती आपल्या मावळ्यांच्या रक्तामुळे आणि शिवरायांच्या चरणामुळे पवित्र झाली आहे, असं तिचं म्हणणे आहे.

सोमवार, २५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता पुणे जिल्ह्यातील अतिकठीण जीवधन किल्ला सर केल्यानंतर गडाच्या माथ्यावर तिने ‘गडकिल्ले वाचवा, महाराष्ट्र वाचवा’ असा संदेश देणारा फलक झळकावला. त्यानंतर पायथ्याच्या घाटघर गावात तिचा घाटघर ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. या सोहळ्यामध्ये तिने महाराजांच्या प्रतिमेचे आणि १०० गडांच्या पवित्र मातीचे पूजन केले.

हे ही वाचा:

इस्राइलच्या बॉम्बवर्षावात गाझातील ७० लोक ठार

चोर घोड्यावरून आले, पण कुत्र्यांनी पळवून लावले!

अटल.. अचल.. अविचल.. अटल बिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान, गृहमंत्र्यांकडून आदरांजली

जयपूर; १४ वर्षीय शाळकरी मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!

तिच्या या ऐतहासिक मोहिमेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुमारे ५० गिर्यारोहक सहभागी झाले होते. या आधी शर्विकाने अनेक विक्रम प्रस्थापित करून महाराष्ट्राचे नाव ‘वर्ल्ड बुक ऑफ लंडन’सह दहा रेकॉर्ड बुक मध्ये झळकावले आहे. तिच्या या कामगिरीची नोंद सुद्धा विविध रेकॉर्ड बुक मध्ये होणार आहे. त्यामुळे तिच्यावर सध्या विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version