महाराष्ट्रात सध्या मान्सूनची प्रतिक्षा लागलेली असताना दुसरीकडे चक्रीवादळाचा धोका राज्यावर विशेषतः किनारपट्टीवर घोंगावताना दिसत आहे. अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ निर्माण झाल्याने आता पाऊस आणखी लांबला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, ५ जून रोजी दक्षिण पूर्व अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झालं आहे. तसेच पुढील २४ तासात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.
मान्सून आधी ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्याने पावसावरही त्याचा परिणाम झाला आहे. ‘दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर चक्रीवादळ तयार झालं आहे. हे चक्रीवादळ सरासरी समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटरपर्यंत पसरलं आहे. या चक्रीवादळामुळे पुढील २४ तासांत दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची दाट शक्यता आहे,’ अशी माहिती मुंबई हवामान विभागाने दिली आहे.
पुढील ४८ तासांत चक्रीवादळ उत्तरेकडे सरकण्याची आणि लगतच्या पूर्वमध्य अरबी समुद्रावरील दबाव क्षेत्र तीव्र होण्याची शक्यता आहे, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच खोल समुद्रात मासेमारीसाठी जाताना मच्छीमारांनी सावध राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हे ही वाचा:
गोव्यात भरणार वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव
तेज प्रताप यादवांचा अजब तर्क, म्हणे बिहारमधील पूल कोसळायला भाजपा जबाबदार
लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींना अमेरिकेचे सडेतोड उत्तर
धक्कादायक! पुतण्याने बॉलला हात लावला म्हणून काकाचे बोट कापले
साधारणपणे १ जूनपर्यंत मान्सून भारतात दाखल होतो. पण यंदा मान्सून केरळमध्ये उशिरा पोहोचणार आहे. मान्सून सुरू होतानाच अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झाल्याने याचा परिणाम पावसावर होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बिपरजॉय चक्रीवादळ निर्माण झालं आहे. पुढील २४ तासांत चक्रीवादळाची तीव्रता वाढणार आहे.