हिमाचल प्रदेशात १० हजारांहून अधिक पर्यटक अडकले

बचावकार्याला सुरुवात

हिमाचल प्रदेशात १० हजारांहून अधिक पर्यटक अडकले

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसानंतर बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्याच्या दुर्गम भागात १० हजारांहून अधिक पर्यटक अकडून पडले आहेत. त्यांच्या मदतीसाठी प्रशासनाने सहा हेलिकॉप्टर्स तैनात केले आहेत.

राज्यातील लाहौल स्पितीच्या चंद्रतालमध्ये तीन फुटांपेक्षा जास्त बर्फवृष्टी होऊन तापमान उणे ४० अंशांपर्यंत घसरत आहे. त्यामुळे चंद्रतालपर्यंत पोहोचणे कठीण होत आहे. दोन दिवसांच्या बचावकार्यात प्रशासनाने रस्त्यावरून सुमारे १२ किमी बर्फ हटविला आहे, तर सुमारे २५ किमीचा रस्ता अद्याप साफ करणे बाकी आहे. त्यानंतरच चंद्रताल येथील सुमारे २९३ पर्यटकांची सुटका करणे शक्य होणार आहे. बर्फाच्या उंच डोंगरावरून चालत संदेशवाहक चमू चंद्रताल येथे गेले आहेत.

स्पितीच्या बटालमध्येही मोठ्या संख्येने पर्यटक अडकल्याची माहिती आहे. जिल्हा प्रशासनाने एक पथकही येथे पाठवले आहे. चंद्रतालमध्ये अडकलेल्या पर्यटकांमध्ये काही विदेशी पर्यटक आणि महिलाही असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सखू म्हणाले की, “वृद्ध आणि आजारी पर्यटकांची प्रथम प्राधान्याने सुटका केली जाईल. आज दिवसभर हवामान स्वच्छ राहिल्यास बचाव कार्याला वेग येईल.”

शेकडो पर्यटक कुल्लू जिल्ह्याच्या उंच भागात हॉटेल, होम स्टे, तात्पुरते तंबू किंवा लोकांच्या घरी अडकून पडले असल्याचे सांगितले जात आहे. मोबाईल नेटवर्क बंद पडल्याने आणि ब्लॅकआऊटमुळे फोन बंद पडल्याने त्यांच्या नातेवाईकांशी त्यांचा संपर्क तुटला आहे. सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे मुख्यमंत्री सखू यांनी सांगितले. राज्यातील चंदिगड- मनाली महामार्ग पूर्ववत झाल्यानंतर कुल्लू जिल्ह्यात अडकलेल्या लोकांनी हळूहळू आपापल्या घरी जाण्यास सुरुवात केली आहे.

हे ही वाचा:

पश्चिम बंगाल निवडणुकीत उमेदवारांचे कारनामे; मतपत्रिका चावल्या; तलावात उडी

आणखी एका चित्त्याचा कुनो राष्ट्रीय अभयारण्यात मृत्यू

उद्धव ठाकरेंनी लोकांना वेळ दिला नाही, ठाकरे गटात संवादाचा अभाव

सप्तशृंगी गडावरून बस ४०० फूट दरीत कोसळली

गेल्या १५ तासांत कुल्लू जिल्ह्यातील विविध भागांतून पाच हजारहून अधिक वाहनांतून पर्यटक आपापल्या घरी परतले आहेत. तर चंबाच्या मनीमहेशमध्ये २०० पर्यटक चार दिवसांपासून अडकून पडले आहेत. रस्ता जोडणीअभावी त्यांची सुटका करणे कठीण झाले आहे. किन्नौरच्या भावा व्हॅलीमध्ये डझनहून अधिक ट्रेकर्सही अडकले आहेत आणि लाहौल स्पितीच्या उदयपूर व्हॅलीमध्येही मोठ्या संख्येने पर्यटक अडकले आहेत. चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी घटनास्थळी स्थानिक पोलिसांना दोन सॅटेलाइट फोन देण्यात आले आहेत. पुरामुळे कनेक्टिव्हिटी व्यवस्थेवर वाईट परिणाम झाला असून राज्य सरकार ती पूर्ववत करण्यासाठी ठोस पावले उचलत आहे.

Exit mobile version