भारतात यंदा मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. भारतातील एकूण पावसापैकी तब्बल ७० टक्के वाटा असणारा आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा असणारा मान्सून यंदा सामान्य राहणार असल्याने सर्वांनाच दिलासा मिळणार आहे.
मोसमाच्या उत्तरार्धात अधिक पाऊस पडण्याचा अंदाज खासगी हवामान संस्था ‘स्कायमेट’ने मंगळवारी वर्तवला. भारतीय हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनीही या वर्षी अनुकूल मान्सून राहील, असे म्हटले आहे. अल निनोची स्थिती कमी होत आहे आणि युरेशियामध्ये बर्फाचे आवरणही कमी झाले आहे. हवामान विभाग या महिन्याच्या अखेरीस मान्सूनचे पूर्वानुमान जाहीर करेल.
जून ते सप्टेंबर या चार महिन्यांसाठी ८६८.७ मिमी दीर्घकालीन सरासरीच्या १०२ टक्के पाऊस असू शकतो. दीर्घकालीन सरासरीच्या ९६ ते १०४ टक्क्यांदरम्यान पाऊस सामान्य समजला जातो. दक्षिण, पश्चिम आणि उत्तर-पश्चिम क्षेत्रांत चांगल्या पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.
‘अल निनो झपाट्याने ला निनाकडे वळत आहे. ला निना वर्षांमध्ये मान्सूनचे अभिसरण अधिक मजबूत होते. सुपर एल निनो ते मजबूत ला नीना या संक्रमणामुळे ऐतिहासिकदृष्ट्या योग्य मान्सूनस्थिती निर्माण झाली आहे. तथापि, पावसाळ्याची सुरुवात अल निनोच्या परिणामांमुळे होण्याच्या विपरित परिणासह होऊ शकते’, असे भाकीत स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंह यांनी वर्तवले आहे.
पूर्व विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरातील पाण्याची असामान्य तापमानवाढ हे एल निनोचे वैशिष्ट्य आहे आणि भारतातील उष्ण उन्हाळा, दुष्काळ आणि कमकुवत मान्सूनच्या पावसाशी त्याचा संबंध आहे. त्यामुळे ला निनाचा विपरीत परिणाम होतो.
स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार, अतिवृष्टीची १० टक्के शक्यता आहे (दीर्घकालीन सरासरीच्या ११० टक्के पेक्षा जास्त), सामान्यपेक्षा २० टक्के जास्त पाऊस पडू शकतो. हे प्रमाण दीर्घकालीन सरासरीपेक्षा १०५ ते ११० टक्के राहू शकेल. तर ४५ टक्के सामान्य पाऊस पडेल. हे प्रमाण सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के असेल. तर, १५ टक्के पाऊस सामान्यपेक्षा कमी असेल. हे प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या ९० ते ९५ टक्के असेल. तर दुष्काळाची परिस्थिती १० टक्के असेल. हे प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या ९० टक्के असेल.
गेल्या वर्षी, स्कायमेटने दीर्घकीन सरासरीच्या ९४ टक्के वर ‘सामान्यपेक्षा कमी’ श्रेणीत मान्सून असण्याचा अंदाज वर्तवला होता, जो अचूक ठरला. गतवर्षी, पावसाचे आगमन होण्यास उशीर झाल्यामुळे जूनचा पाऊस सरासरीपेक्षा नऊ टक्के कमी होता, परंतु जुलैच्या पावसाने सरासरीपेक्षा १३ टक्के वर पुनरागमन केले. ३६ टक्के तुटीसह ऑगस्ट हा रेकॉर्डवरील सर्वात कोरडा होता, परंतु सप्टेंबरमध्ये पुन्हा पावसाने दमदार पुनरागमन केले आणि देशात सामान्यपेक्षा १३ टक्के जास्त पाऊस झाला.
हे ही वाचा:
हैदराबादचा घरच्या मैदानाशिवाय पहिलाच विजय!
नरेंद्र मोदींसाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा
‘मोदी सरकारच्या काळात चीन एक इंचही जमीन काबीज करू शकला नाही’
ईडीने सादर केलेल्या पुराव्यांनुसार अरविंद केजरीवालांची अटक योग्य
भारतीय हवामान खात्याचा अधिकृत मान्सून अंदाज १५ एप्रिलच्या आसपास अपेक्षित आहे. स्कायमेटने दक्षिण, पश्चिम आणि वायव्य भागात चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा केली असून, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील महत्त्वाच्या मान्सून पर्जन्य क्षेत्रामध्ये पुरेसा पाऊस पडेल. तथापि, बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या पूर्वेकडील राज्यांमध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाची कमतरता आहे, ईशान्य भारतात जून आणि जुलैमध्ये सामान्यपेक्षा कमी पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.