अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या ‘बिपोरजॉय’ चक्रीवादळाच्या दिशेवर मोसमी वाऱ्याची आगामी वाटचाल अवलंबून असून या वादळामुळेच महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन लांबणार आहे. आता मॉन्सून १६ जूननंतर दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चक्रीवादळाच्या दिशेवर मोसमी वाऱ्याची आगामी वाटचाल अवलंबून असली तरी पोषक वातावरण राहिल्यास राज्यात १६ जूनला मोसमी वारे दाखल होतील आणि २२ जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापून पुढे वाटचाल करतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आयएमडीनं दिलेल्या इशाऱ्यानुसार वादळामुळे येत्या २४ तासांमध्ये कोकणचा किनारपट्टी भाग, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील बहुतांश भागांमध्ये पाऊस हजेरी लावणार आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघरमध्येही सोसाट्याचा वारा आणि पावसाची हजेरी पाहायला मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
तीव्र दाबाचा पट्टा चार किमी प्रतितास इतक्या वेगाने उत्तरेला पुढे सरकत आहे. सध्याच्या घडीला हे वादळ मुंबईपासून ९०० किलोमीटरवर अरबी समुद्रात सक्रिय आहे. पुढील काही तासांत त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मासेमारीसाठी समुद्रात जाणाऱ्या मच्छिमार बांधवाना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हे ही वाचा:
अमेरिकी संसदेच्या संयुक्त सत्रात मोदी दुसऱ्यांदा संबोधित करणार
वसतीगृहात तरुणीचा बलात्कार करून हत्या करणाऱ्या सुरक्षा रक्षकाची आत्महत्या
काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकींची पत्रकाराला धमकी
पूल कोसळल्यानंतर आता काम सुरू असलेल्या रुग्णालय इमारतीला भेगा
याचा परिणाम मान्सूनवर होणार असून राज्यात आणि केरळातही मान्सून लांबणीवर पडला आहे. दरम्यान, वादळाच्या काळात होणारा पाऊस हा मान्सून नाही ही बाब लक्षात घ्यावी, असंही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.