मुंबई आणि उपनगरात सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत काही दिवसात मान्सून दाखल होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले होते. त्यानुसारच मुंबईत आज पहाटेपासूनच पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. पण या सरी मान्सूनपूर्व असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.
मुंबईच्या पूर्व उपनगरात मुलुंड, भांडुप,चेंबूर, सायन या सर्वच भागात पावसाची संततधार सुरू असून पश्चिम उपनगरात मालाड, गोरेगाव, बोरीवली, कांदिवली, अंधेरी, जोगेश्वरी, अशा सर्वच भागात पाऊस सुरू आहे. तर ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मीरा भाईंदर, या भागातही पावसाला सुरुवात झाली आहे.
हवामान खात्याने मुंबई उपनगरांसह रायगड, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर मुंबई आणि कोकण परिसरात ९ जून ते १२ जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. बुधवार ९ जून पासून मुंबईत पाऊस कोसळायला लागला असून त्याचे परिणामही दिसू लागले आहेत.
हे ही वाचा:
मुंबईत गुन्हेगारीचा आलेख वाढला
छे ! छे !! उद्धव ठाकरे अजिबात वाकले नाहीत…
कोव्हिशिल्डची किंमत ७८०, तर कोव्हॅक्सिन १४१० ला
गांधीजींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत सात वर्षांची शिक्षा
या पावसाचे परिणाम परिणाम मुंबईकरांना जाणवू लागले आहेत. दरवर्षीप्रमाणे सायन ब्रीज, सायन गांधी मार्केट, किंग्स सर्कल परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तर मुंबईच्या इतरही काही भागात पाणी तुंबू लागले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीवर परिणाम होताना दिसत आहे.
महापालिकेच्या उपाययोजना
९ जून ते १२ जून हे चार दिवस मुंबई आणि कोकण पट्ट्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे मुंबई महापालिकेकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दरवर्षी मुंबईच्या ज्या भागात पाणी साचते तिथे पाणी उपसायच्या पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर अशा ठिकाणी सहाय्यक अभियंते हजर राहणार आहेत . या चार दिवसांच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.