चांदिवलीमधील रहिवासी माकडांच्या उपद्रवाने त्रस्त झाले आहेत. ही माकडे स्थानिक रहिवाशांच्या घरांची स्लायडिंगची दारे आणि खिडक्या उघडून घरात घुसत आहेत. तसेच, घरांतील खाद्यपदार्थांचा फडशा पाडून ती घेऊन पोबारा करत आहेत. माकडांच्या या उपद्रवामुळे महिला आणि लहान मुलांची पाचावर धारण बसली आहे.
ही माकडे आणि लंगूर चांदिवली परिसरात गटागटाने फिरत आहेत. अनेक इमारतींमध्ये डागडुजी किंवा रंगकामासाठी बांबूंच्या परांची बांधल्या आहेत. त्यावरून माकडांना चढणे सोयीचे होत असल्याने अशा इमारती या माकडांनी लक्ष्य केल्या आहेत. ‘घरात घुसल्यानंतर ही माकडे घरातील सर्व पदार्थ फस्त करून टाकतात. ते फ्रिज उघडतात, अंडी आणि ज्यूसची बाटलीही फोडून टाकतात. यातील काही माकडे आणि लंगूर तर आकाराने मोठी असल्याने रहिवाशांमध्ये विशेषत: महिलावर्ग आणि मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे,’ अशी तक्रार एका रहिवाशाने केली.
हे ही वाचा:
अमेरिकेमध्ये १ ऑक्टोबरपासून शटडाऊनचे संकट
ईदच्या जुलूसमधील टवाळखोरांकडून महिला पोलीस कॉन्स्टेबलची छेड, विक्रोळीत तणाव
विसर्जन सोहळ्यादरम्यान हरवलेल्या २२ मुलांना पालकांकडे सोपवले!
आशियाई स्पर्धेत टेनिसमध्ये भारताला सुवर्ण
‘माकडांच्या धुमाकुळामुळे महिला आणि मुले अस्वस्थ झाली आहेत. आम्हीदेखील रहिवाशांना माकडांना खायला घालू नका, घरांचे स्लायडिंग दरवाजे बंद करा, असे आवाहन केले आहे. मात्र खिडक्या-दारे सदैव बंद कशी करायची, असा प्रश्न आम्हाला ज्येष्ठ नागरिक विचारत आहेत. काही माकडे तर स्लायडिंग दरवाजे उघडून घरात घुसतात. आम्ही एकप्रकारे स्वत:ला असहाय्य समजू लागलो आहोत. आम्ही बांबूची परांची हटवू शकत नाही कारण इमारतीचे काम दीर्घकाळ चालणार आहे. हा प्रश्न केवळ वनविभाग सोडवू शकतो. आम्हाला माकडांना कोणतीही दुखापत करायची नाही,’ असे चांदिवली सिटिझन्स वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक मनदीपसिंग मक्कर यांनी सांगितले.
‘आमच्या सोसायटीमध्ये रंगकाम सुरू आहे. त्यामुळे आम्ही बांबूची परांची बांधली आहे. पण ही माकडे त्याच्यावर चढून स्वयंपाकघरात घुसत आहेत, सगळ्या वस्तू इतस्तत: फेकतात. ते पार्किंगच्या जागी किंवा अन्य मोकळ्या जागी जातात, जिथे मुले खेळत असतात. आम्ही याची छायाचित्रे वन विभागाला पाठवली आहेत,’ असे एका रहिवाशाने सांगितले. रहिवाशी संघटनेने याबाबत वनविभागाला कळवल्यानंतर तेथील अधिकाऱ्याने रहिवाशांना माकडांना अन्न खाण्यास देऊ नका आणि माकडांना घाबरवण्यासाठी फटाके फोडा, असा सल्ला दिला आहे.
‘आम्ही माकडांना पकडून त्यांना त्या जागेवरून हाकलून लावू शकत नाही. माकडे ही सहसा त्यांचा नैसर्गिक अधिवास असलेल्या जंगलापासून लांब निवासी भागांत आढळतात. जर ही माकडे लोकांवर हल्ला करत असतील, तर परिस्थिती पाहून आम्ही त्यांना पकडू आणि त्यांना जंगलात सोडू,’ अशी माहिती वनअधिकाऱ्यांनी दिली.