जमीन नोंदणी करण्यासाठी लागणाऱ्या स्टॅम्प पेपरची खरेदी करण्यासाठी जात असलेले वकील विनोद कुमार शर्मा यांच्या हातातील दोन लाख रुपये रक्कम असलेली बॅग माकडाने पळवली आणि उंच झाडावर जाऊन बसला. मग घडले ते मजेशीर होते. पण माणसापेक्षा माकडं बरी अशी म्हणण्याची वेळ या घटनेमुळे आली.
या सगळ्या प्रकारामुळे जमलेल्या गर्दीने आरडाओरडा करून आणि टाळ्या वाजवून गोंधळ घातल्यामुळे माकडाने शर्मा यांची बॅग खाली टाकली. मात्र, बॅग खाली फेकण्यापूर्वी माकडाने बॅगेतील काही रक्कम काढून घेतली आणि त्या नोटा झाडावरून खाली फेकण्यास सुरुवात केली.
विनोद कुमार शर्मा हे जमिनीच्या नोंदणीसाठी स्टॅम्प पेपरची खरेदी करण्यासाठी रामपूरच्या शाहबाद शहरात जात होते. त्यांच्या हातात पैसे असलेली बॅग होती. रस्त्यावरून चालताना अचानक माकडाने ती बॅग पळवली. जमलेल्या गर्दीने आरडाओरडा केल्यावर माकडाने बॅग फेकली त्यात एक लाख रुपये होते. जमलेल्या गर्दीने पुन्हा आवाज काढून आणि टाळ्या वाजवून माकड पैसे खाली फेकेल म्हणून प्रयत्न केले. मात्र, माकडाने नोटा सुट्या करून खाली फेकण्यास सुरुवात केली.
गर्दीत जमलेले अनेक लोक हे पैसे जमा करून स्वतःच्या खिशात घालण्यासाठी पुढे सरसावले, तेव्हा मात्र शर्मा यांना पैसे लोकांकडून परत मिळवण्यासाठी लोकांना विनंती करावी लागली. शर्मा यांनी बराच वेळ लोकांकडे विनंती केल्यावर लोकांनी इतरत्र पडलेले पैसे गोळा करून शर्मा यांना दिले. तब्बल अर्ध्या तासाने शर्मा यांच्याकडे ९५ हजार जमले, तरीही पाच हजार शर्मा यांच्या हाती आलेच नाहीत.
हे ही वाचा:
‘अपमानित’ कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा
…आणि भाईगिरीतून मित्रानेच केली मित्राची हत्या!
बनावट छाप्याच्या नाट्यामुळे अंगावर आला काटा!
माकडाच्या या पराक्रमाचा काही लोकांनी व्हिडीओ बनवला होती. हा व्हिडीओ काही क्षणातच समाज माध्यमांवर व्हायरल झाला. ‘माकडाने हातातली बॅग खेचली आणि तो जाऊन झाडावर बसला तेव्हा मला प्रचंड धक्का बसला. आम्ही माकडाचा पाठलाग करून बॅग परत मिळवण्याच्या प्रयत्न केला, तर तो अजूनच उंचावर जाऊन बसला आणि त्याने काही नोटा खाली फेकण्यास सुरुवात केली,’ असे वकील विनोद कुमार शर्मा यांनी सांगितले.
शर्मा आणि इतर काही वकील माकडाकडून बॅग घेण्याचा प्रयत्न करत होते. शर्मा यांनी झाडावर चढण्याचेही प्रयत्न केले मात्र पावसामुळे ते शक्य झाले नाही. न्यायालयात येणाऱ्या अनेकांच्या बॅग हे माकड खेचून पळत असतात, असे अफ्फान अहमद या प्रत्यक्षदर्शीने ‘टाइम्स’शी बोलताना सांगितले.