भारताने आठव्यांदा जिंकला आशिया चषक

श्रीलंकेविरुद्ध २६३ चेंडू राखून जिंकला भारत, सिराजचे अर्धा डझन बळी

भारताने आठव्यांदा जिंकला आशिया चषक

भारत आणि श्रीलंका हे संघ अंतिम फेरीत काय कमाल करणार, आशिया चषक क्रिकेट स्पर्धा कोण जिंकणार याचे सगळेच कुतुहल श्रीलंकेच्या फलंदाजीनंतर संपुष्टात आले. भारताने श्रीलंकेला अवघ्या ५० धावांत गारद करत ६.१ षटकांतच विजेतेपदाचा चषक जिंकला. तब्बल २६३ चेंडू राखून भारताने ही लढत जिंकली.

 

 

श्रीलंकेला अवघ्या ५० धावांत गुंडाळल्यानंतर भारताला फारसे काही करण्यासारखे राहिलेच नाही. इशान किशन (२३) आणि शुभमन गिल (२७) या सलामीवीरांनी ६.१ षटकांतच निर्धारित लक्ष्य पूर्ण केले. त्याआधी, श्रीलंकेचा संपूर्ण संघच अवघ्या ५० धावांत माघारी परतला. ५० षटकांच्या या खेळात केवळ ५० धावांच श्रीलंकेच्या संघाला करता आल्या. त्यासाठी त्यांनी घेतली ती १५.२ षटके. यापेक्षाही महत्त्वाची कामगिरी होती ती मोहम्मद सिराजची. त्याने ७ षटकांत २१ धावा देत ६ बळी घेतले आणि श्रीलंकेचा संघ उद्ध्वस्त केला.

 

 

भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा अंतिम सामना कसा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. पण श्रीलंकेच्या संघाने भारतीय वेगवान गोलंदाजीपुढे अक्षरशः लोटांगण घातले. अवघ्या १२ धावांतच श्रीलंकेचे ६ फलंदाज माघारी परतले होते. त्यामुळे या सामन्याचे भवितव्य तेव्हाच निश्चित झाले.

 

 

सलामीवीर कुसल परेराला बुमराहने शून्यावर बाद केल्यानंतर मोहम्मद सिराजने चौथ्या षटकात तब्बल चार बळी घेत श्रीलंकेचे कंबरडेच मोडले. त्याने पहिल्या, तिसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या चेंडूवर श्रीलंकेच्या फलंदाजांना माघारी धाडले. त्यावेळी श्रीलंकेची स्थिती ५ बाद १२ अशी बिकट झाली होती. सिराजने त्यानंतर सहाव्य षटकात आणखी एक बळी घेतला तो चौथ्या चेंडूवर. शनकाला त्याने बाद केले. तेव्हाही श्रीलंकेच्या खात्यात १२ धावाच होत्या.

 

 

श्रीलंकेचा कुसल मेंडिस याने १७ धावांची सर्वोच्च खेळी केली तर दुशन हेमंता याने १३ धावा केल्या. बाकी फलंदाज एकेरी धाव काढून माघारी परतले. पाच फलंदाज तर भोपळाही फोडू शकले नाहीत. भारताच्या हार्दिक पंड्यानेही ३ धावा देत ३ बळी घेतले.

 

 

हे ही वाचा:

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘ नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबवणार

संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने महाराष्ट्रातील सात कलावंतांना सन्मान

२० लाखांच्या कथित लाचप्रकरणी सीबीआयकडून सात जण अटकेत

देशात २३ नव्या सैनिकी शाळा उभारणीला मान्यता

 

धावफलक

श्रीलंका :  सर्वबाद ५० (कुसल मेंडिस १७, दुशन हेमंत १३, मोहम्मद सिराज २१-६, हार्दिक पंड्या ३ धावांत ३ बळी)

पराभूत विरुद्ध भारत ६.१ षटकांत बिनबाद ५१ (इशान किशन नाबाद २३, शुभमन गिल नाबाद २७)

Exit mobile version