मोदींचा चेहरा आणि शिवसेनेतील फाटके मुखवटे

मोदींचा चेहरा आणि शिवसेनेतील फाटके मुखवटे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला उधाण आले आहे. औरंगाबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा उल्लेख त्यांनी आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी असा केला. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या. राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले. त्यात मुख्यमंत्री बोलायच्या आदल्याच दिवशी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी ‘माजी मंत्री म्हणू नका… लवकरच काय ते कळेल’ असे म्हटले असल्याने या चर्चांना अधिकच जोर येणे स्वाभाविक होते. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असे विधान का केले असावे हे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी लिहिलेला अग्रलेख वाचून समजते.

‘मोदी है तो मुमकिन है’ या मथळ्याखाली लिहिलेल्या अग्रलेखात संजय राऊत म्हणतात, “मोदी हाच भारतीय जनता पक्षाचा चेहरा आहे आणि बाकी सारे फाटके मुखवटे आहेत. मोदींचा चेहरा नसेल तर भाजपा मधील सध्याचे अनेक नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकीतही पराभूत होतील.” राऊतांचे हे विधान अर्धसत्य आहे. 

मोदी हाच चेहरा आहे.  हे राऊत यांचे म्हणणे शतप्रतिशत खरे आहे आणि राऊत ज्यांना फाटके मुखवटे म्हणतात तसे अनेक मुखवटे आज शिवसेनेत आहेत. जे केवळ आणि केवळ मोदींचा चेहरा आणि नाव वापरून निवडून आले आहेत. इतर वेळी त्यांना शिवसेनेच्या नावावर आणि उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर नगरपालिका सोडाच पण साधी ग्रामपंचायत तरी मारता आली असती का? हा प्रश्नच आहे सत्य बोलून दाखवले नसले तरीही संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे दोघेही जाणतात.

 २०१९ ला शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. या खासदारांनी मोदींचेच नाव आणि चेहरा वापरून आपली प्रचार मोहीम राबवली होती आणि म्हणूनच त्यांच्या माथी विजयी गुलाल लागला. मोदींचे नाव सोबत नसेल तर स्वतः उद्धव ठाकरेही निवडून येऊ शकत नाहीत. म्हणूनच त्यांनी मुख्यमंत्री झाल्यावर निवडणूक न लढवता विधान परिषदेवर जाण्याचा निर्णय घेतला.

नरेंद्र मोदी या नावाची जादू कमी होईल असे आजवर अनेकांना वाटले अनेकांनी तसे झाल्याचे निष्कर्षही काढले. पण भारताच्या जनतेने या सर्वांचे दात कायमच घशात घातले आहेत. मॉर्निंग कन्सल्ट या अमेरिकेच्या सर्वे एजन्सीने नुकत्याच घेतलेल्या एका मतचाचणी नुसार नरेंद्र मोदी हे आजही जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत आणि तेही थोड्याथोडक्या नाही तर ७०% टक्के अशा घवघवीत पाठिंब्याने!

२०१४ ची मोदी लाट २०१९ साली त्सुनामी होऊन आली. या लाटेने विरोधकांना राजकीय पटलावरून कुठच्या कुठे फेकून दिले होते. विद्यमान लोकसभेचा अर्धा कार्याकाळ संपत आला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेचाही चाळीस टक्के कार्यकाळ पूर्ण होत आला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. या निवडणुकीत आपण भाजपा सोबत गेलो नाही तर या त्सुनामीत दूरवर फेकले जाऊ नये याची भीती बहुदा शिवसेनेला आता जाणवू लागली आहे.

म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कडून यांच्याकडून भावी सहकारी वगैरे म्हणत भाजपाला इशारे केले जात आहेत. महाविकास आघाडीचा सत्ताप्रयोग महाराष्ट्रातल्या बहुतांश जनतेच्या पसंतीस पडलेला नाही. महाराष्ट्राच्या जनतेने ज्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारले होते. त्यांना शिवसेना पुन्हा सत्तेत घेऊन आली अशी भावना जनतेच्या मनात आहे. त्यात हे सरकार प्रत्येक पातळीवर अपयशी ठरताना दिसत आहे.

हे ही वाचा:

सप्टेंबर अखेरपर्यंत असेल पावसाचा डेरा

चीनला इशारा देणारा ‘ऑकस’ सैन्य करार आहे तरी काय?

‘उद्धवजी, अनैसर्गिक आघाडी केल्याचे आता लक्षात येत असेल ना?’

नक्षलवाद्यांचे चिन्ह वापरून खंडणी मागणाऱ्यांना बेड्या

कोविड रुग्णसंख्या, मृत्यू यात महाराष्ट्र देशात अव्वल आहे. महिला सुरक्षेचा बट्ट्याबोळ झाला आहे. वाढत्या गुंडगिरीमुळे व्यापारी वर्ग त्रस्त आहे. सततच्या लॉकडाऊनमुळे मध्यमवर्गाचे कंबरडे मोडले आहे. सरकारमधील मंत्री हे वसुलीबाजीत व्यस्त आहेत. पोलीस खात्यातील अधिकारीच खुनाच्या सुपाऱ्या वाजवत आहेत. हे सगळं होऊनही राज्याच्या प्रमुख पदी बसलेले मुख्यमंत्री हे घरातून बाहेर पडायला तयार नाहीत. उलट बेस्ट सीएम म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत.

या सर्व परिस्थितीत जनता पिचली आहे. या तीन पक्षांना सत्तेतून दूर फेकण्याची संधी शोधत आहे. आगामी निवडणुकीत ही संधी जनतेला मिळणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेना सत्तेत  तर आली. पण त्याची नेमकी काय किंमत मोजावी लागणार याची कल्पना बहुदा त्यांनी केली नसावी. कारण या आघाडीचा सगळ्यात जास्त फटका हा शिवसेनेलाच बसणार आहे.

भाजपासोबत जुळवून घेतले नाही तर आगामी काळात आपल्याला बरेच कठीण जाईल अशी कुजबुज शिवसेना नेत्यांमध्ये पडद्यमागे कायमच रंगलेली असते. ही कुजबुज आता वाढू लागली आहे. यावर वेळीच पाऊले उचलली नाही तर आगामी काळात शिवसेना पक्षाला गळती लागण्याचीही चिन्हे आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन ते शिवसेनेला कंटाळले असल्याचे विधान केले होते. अशी अंतर्गत धुसफुस शांत करण्यासाठी भाजपसोबत जाणे हा एकमेव पर्याय आहे. यासाठी उद्धव ठाकरे यांच्यावर पक्षातून दबाव असण्याचीही शक्यता आहे. 

२०१९ ची विधानसभा निवडणूक जर पाहिली तर तेव्हाच शिवसेना विरोधातील जनमताचा अंदाज आला होता. शिवसेना १२४ जागांवर लढली होती आणि त्यात पन्नास टक्के जागाही निवडून आणू शकली नाही. जेमतेम ५६ जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले होते. या ज्या जागा निवडून आल्या त्यामागेही मोदी नावाचाच जलवा होता.

त्यामुळे सामनाच्या संपादकीयमधून मोदींविरोधात काहीही खरडले तरीही मोदींच्या चेहऱ्या विरोधात निवडणूक लढण्याची शिवसेनेची हिम्मत नाही. ‘मोदी है तो ही मुमकीन है’ हे शिवसेना पुरते ओळखून आहे. त्यामुळे मोदींचा चेहरा नसेल तर नुसते फाटके मुखवटेच नाही तर वाघाचे कातडेही फाटले जाईल यात शंका नाही.

Exit mobile version