नरेंद्र मोदी ३००पेक्षा अधिक जागांसह तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील!

गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना दिले चोख प्रत्युत्तर

नरेंद्र मोदी ३००पेक्षा अधिक जागांसह तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील!

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकणार असल्याची घोषणा करणाऱ्या विरोधकांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रहार केला. विरोधकांचे हे अत्यंत खालचे राजकारण असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतीयांनी दोनवेळा प्रचंड बहुमताने निवडून दिले आहे आणि तिसऱ्या वेळेसही भारतातील जनता नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा ३०० पेक्षा अधिक जागांसह २०२४ला निवडून देतील, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला.

 

२८ मे रोजी पंतप्रधानांच्या हस्ते नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन होणार असून त्या कार्यक्रमावर जवळपास काँग्रेससह १९ पक्षांनी बहिष्कार घातला आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन व्हायला पाहिजे, अशी विरोधकांची मागणी आहे. त्यावरून अमित शहा यांनी आपले म्हणणे मांडले.

 

गुवाहाटी आसाम येथे झालेल्या भाषणात अमित शहा म्हणाले की, काँग्रेसची भूमिकाच नकारात्मक आहे. काँग्रेस आणि त्यांच्यासोबत असलेल्या पक्षांनी अत्यंत खालच्या दर्जाच्या राजकारणाचे दर्शन घडविले आहे. या सगळ्या विरोधकांचे म्हणणे आहे की, राष्ट्रपतींनीच या वास्तूचे उद्घाटन करायला हवे. पण अशी अनेक उदाहरणे देता येतील ज्यात याच विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यात राज्यपालांना भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला बोलावण्यात आलेले नाही. जेव्हा छत्तीसगडच्या नव्या विधानसभा वास्तूचा पायाभरण समारंभ होता तेव्हा राज्यपालांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. उलट काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांना निमंत्रित करण्यात आले होते. झारखंडमधील हेमंत सोरेन, आसाममधील तरुण गोगोई सरकार, मणिपूरमधील काँग्रेस सरकार, तामिळनाडूतील सरकार यांनीही अगदी याचाच कित्ता गिरविला आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही करता तेव्हा ते ठीक असते पण भाजपाने केले की तुम्ही त्यावर बहिष्कार घालता.

हे ही वाचा:

मोफत तिकीट द्या, वीज द्या…कर्नाटकवासी काँग्रेस सरकारच्या लागले मागे

मायावतींचा संसदभवन उद्घाटनाला पाठिंबा; विरोधकांना सुनावले

इंग्रजांनी बांधलेल्या जुन्या संसद भवनाचे काय होणार?

संसदभवन उद्घाटनावर बहिष्कार हे विरोधकांच्या वैफल्यग्रस्ततेचे निदर्शक

अमित शहा म्हणाले की, भारताच्या जनतेने दोन तृतियांश बहुमत देत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावर बसवले आहे. त्यांना काँग्रेसच्या आशीर्वादाची गरज नाही. यालाच लोकशाही म्हणतात. लोकांनी मोदींना हे बहुमत दिले असले तरी काँग्रेस आणि त्यांच्या राजघराण्याला हे पचत नाही. गेली नऊ वर्षे ते हे वास्तव स्वीकारू शकलेले नाहीत. जेव्हा पंतप्रधान संसदेत बोलतात तेव्हा त्यांनाही हे विरोधक बोलू देत नाहीत. त्यावरही बहिष्कार घालतात.

 

अमित शहा यांनी इशारा दिला की, विरोधकांनो तुम्ही जे करत आहात ते १४० कोटी जनता पाहात आहे. जेव्हा पुढील निव़डणुकीत तुम्ही जनतेचा कौल मागायला जाल तेव्हा तुम्हाला आताएवढ्या जागाही मिळणार नाहीत. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि तेही पुन्हा एकदा ३०० पेक्षा अधिक जागांसह.

Exit mobile version