शनिवारी पुन्हा दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस पडल्यानंतर पूरस्थिती आणखी बिकट झाली. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांच्या दौऱ्यावरून परतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या नायब राज्यपालांना फोन करून दिल्लीतील पूरस्थितीचा आढावा घेतला. दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के सक्सेना यांनी ट्विटरवर मोदी यांनी फोन करून दिल्लीतील संकटाचा आढावा घेतल्याचे सांगितले. तसेच, केंद्र सरकारच्या सहकार्याने दिल्लीकरांच्या हितासाठी शक्य ते सर्व मदतकार्य करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यापूर्वी सक्सेना यांनी फ्रान्समधून झालेल्या दूरध्वनीवरून पंतप्रधान मोदींनी पूरसदृश परिस्थितीची माहिती घेतल्याचा उल्लेख केला होता.
गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे तसेच, हिमाचल प्रदेश आणि उत्तर भारतातील इतर अनेक भागांतील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील हथनीकुंड बॅरेजमधून जादा पाणी सोडण्यात आल्याने दिल्लीत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीतील प्रमुख आणि सखल भागांत पाणी साचले आहे. एकीकडे त्रासलेले प्रवासी गुडघाभर पाण्यातून वाट काढत आहेत. तर, दुसरीकडे बचाव पथके अडकलेल्यांना बाहेर काढत आहेत.
दिल्ली वाहतूक पोलिसांनीही संध्याकाळच्या पावसामुळे काही रस्त्यांवर पाणी साचल्याने आणि झाडे पडल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाल्याची माहिती देत प्रवाशांनी त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे. अपोलो, जसोला मेट्रो स्थानकासमोर पाणी साचल्यामुळे बदरपूर ते आश्रमाकडे जाणाऱ्या कॅरेजवेमध्ये मथुरा रोडवर वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सरिता विहार उड्डाणपुलाजवळ वाहतूक संथ गतीने सुरू होती.
पावसाने शहरातील पारा ३४.६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आणला, असे भारतीय हवामान विभागाने सांगितले. हवामान विभागाने रविवारी हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह सामान्यतः ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवला आहे. यमुना नदीने १३ जुलै रोजी २०८.६ मीटरची पातळी गाठली होती. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, उग्र रूप धारण केलेली यमुना नदी शनिवारी शांत होण्याची चिन्हे दिसली.
तथापि, शनिवारी पावसाच्या ताज्या सरींमुळे जलसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय जल आयोगाच्या म्हणण्यानुसार, यमुनेची जलपातळी शनिवारी सकाळी ७ वाजेपर्यंत २०८.६६ मीटरच्या शिखरावरून गुरुवारी रात्री ८ वाजता २०७.६२ मीटरपर्यंत खाली आली. यमुना नदीच्या पाण्याची पातळी सर्वकालीन उच्चांकावर असल्याने शहराला पूर येण्याचा इशारा देण्यात आला होता. पुरामुळे तीन जलशुद्धीकरण केंद्र बंद पडल्याने शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते.
हे ही वाचा:
सचिन तेंडुलकर करत असलेली जुगाराची जाहिरात बंद करा
दिवसातले २० तास काम करण्याचे रहस्य काय?
ज्ञानव्यापी मशिदीतील कार्बन डेटिंगप्रकरणी २१ जुलै रोजी निर्णय
पंतप्रधान मोदींच्या यूएई दौऱ्यात रुपया ठरला खणखणीत…
राष्ट्रीय राजधानी आणि लगतच्या एनसीआर प्रदेशात जनजीवन ठप्प झाले आहे. शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाण्याची पातळी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे. दिल्लीतील यमुना पूरस्थितीबाबत त्यांनी त्यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. यावेळी सौरभ भारद्वाज, गोपाल राय, इम्रान हुसेन, कैलाश गहलोत आणि राजकुमार आनंद हे कॅबिनेट मंत्री उपस्थित होते. आम आदमी पक्षाने (आप) पुरामुळे विस्थापित झालेल्या लोकांना जेवण देण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या मुख्यालयात ‘पूर मदत स्वयंपाकघर’ स्थापन केले आहे, असे दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी शनिवारी जाहीर केले.
दिल्लीतील पूरसदृश परिस्थिती आणि प्रमुख आणि सखल भागांत गंभीर पाणी साचण्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने शहरात मदत शिबिरे उभारली आहेत. दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) पहाडगंज झोन, सेंट्रल झोन, सिव्हिल लाइन्स झोन, शाहदरा नॉर्थ झोन आणि शाहदरा दक्षिण झोन या पाच झोनमध्ये पूरग्रस्त भागांतील रहिवाशांसाठी ३३ मदत शिबिरे चालवत आहे. सुमारे सात हजार ३७१ नागरिकांनी या शिबिरांमध्ये आश्रय घेतला आहे.