सध्या सुरु असलेले प्रतिदिन ४० किमीच्या महामार्गाचे बांधकाम हे येत्या काळात प्रतिदिन १०० किमी पर्यंत वाढवण्याचं आपलं ध्येय असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. सध्याच्या कामगिरीवर आपण समाधान नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सीआयआय या औद्योगिक संघटनेच्या वार्षिक बैठकीनिमित्ताने मुंबईमध्ये ‘इन्फ्रा कनेक्टिव्हिटी टू फास्ट ट्रॅक इकॉनॉमी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते.
येत्या काळात आपण ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेच्या विकासावर लक्ष्य केंद्रीत करण्यात येणार असून त्याच्या बाजूने लॉजिस्टिक पार्क, लहान शहरे, इन्डस्ट्रियल हब, इन्फ्रास्ट्रक्चर क्लस्टर्स इत्यादी गोष्टींचा विकास केला जाईल असंही केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे या क्षेत्रात परकीय गुंतवणूक आणण्यावरही भर देण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “येत्या तीन महिन्याच्या कालावधीत आपण देशातील महामार्गावरील टोलची सध्या असणारी व्यवस्था बदलून नवीन तंत्रज्ञान आणणार आहोत. त्यामुळे महामार्गावरील प्रवास हा अधिक सुलभ होणार आहे.”
देशातील पायाभूत सुविधांचा विकास हा अत्यंत महत्वाचा असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी स्पष्ट केलं. त्यासाठी देशातील खासगी उद्योगांनी पुढाकार घ्यावा, या क्षेत्रात जास्तीत जास्त गुंतवणूक करावी आणि या क्षेत्रातील विकासाबद्दल सरकारला सूचना द्याव्यात असंही आवाहन नितीन गडकरींनी यावेळी केलं.
हे ही वाचा:
भारत-इंग्लंड दुसरा कसोटी सामना आजपासून
अश्विनी उपाध्याय यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत
भारतात येणार चार नव्या हवाई कंपन्या?
उपग्रह प्रक्षेपणात इस्रोला आले अपयश
देशात कोरोनाचे संकट असतानाही नितीन गडकरींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिवसाला ४० किमीचा महामार्ग बांधण्याचा विक्रम केला आहे. आता यामध्ये वाढ करुन तो दिवसाला १०० किमीपर्यंत वाढवण्याचे ध्येय असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी स्पष्ट केलं आहे.