ग्रेट निकोबारमधील मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे काँग्रेसच्या पोटात पोटशूळ

चीनला चपराक बसवणाऱ्या ‘मेगा इन्फ्रा प्रकल्प’ला काँग्रेसचा जोरदार विरोध

ग्रेट निकोबारमधील मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे काँग्रेसच्या पोटात पोटशूळ

ग्रेट निकोबारमध्ये केंद्र सरकारकडून विकासकामे केली जाणार आहेत. यात ७२ हजार कोटी रुपयांचा ‘मेगा इन्फ्रा प्रकल्प’ सुरू केला जाणार आहे. याअंतर्गत ट्रान्स-शिपमेंट पोर्ट, आंतरराष्ट्रीय विमानतळ, टाउनशिप डेव्हलपमेंट आणि बेटावर ४५० MVA गॅस आणि सौर-आधारित ऊर्जा प्रकल्प विकसित केला जाणार आहे. या प्रकल्पाचे क्षेत्रफळ १३० चौरस किलोमीटर असणे अपेक्षित आहे. यासाठी मंजुरी देखील मिळाली आहे. मात्र, दुसरीकडे या प्रकल्पामुळे काँग्रेसच्या पोटात पोटशूळ उठल्याचे चित्र आहे. पर्यावरणीय कारणास्तव या प्रकल्पावर तसेच प्रदेशातील आदिवासींच्या हक्कांचे कथित उल्लंघनाबाबत काँग्रेसकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

काँग्रेसने ग्रेट निकोबार बेटांमधील केंद्राच्या प्रस्तावित ७२ हजार कोटींच्या ‘मेगा इन्फ्रा प्रकल्प’च्या सर्व मंजुरींना तात्काळ स्थगिती देण्याची आणि संपूर्णपणे निःपक्षपाती पुनरावलोकन करण्याची मागणी केली आहे. या प्रकल्पाचा बेटावरील आदिवासी समुदाय आणि नैसर्गिक परीसंस्थेसाठी धोका असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

काँग्रेसचे कम्युनिकेशन प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, मार्च २०२१ मध्ये NITI आयोगाच्या सांगण्यावरून सुरू झालेला हा प्रकल्प समस्या दर्शवत आहे. या प्रकल्पाच्या पुनरावलोकनाची मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. “पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने १३ हजार ७५ हेक्टर वनजमीन प्रकल्पासाठी देण्याची मंजुरी दिली आहे. हे क्षेत्र बेटाच्या जमिनीच्या वस्तुमानाच्या सुमारे १५% आहे, अशी माहिती जयराम रमेश यांनी दिली आहे. तसेच रमेश यांनी सांगितले आहे की, ज्या किनारपट्टी भागात बंदर आणि प्रकल्प प्रस्तावित आहे ते भूकंप प्रवण क्षेत्र आहे. त्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका आहे. मात्र, काँग्रेसच्या या भूमिकेनंतर त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

जालन्यातील लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांचे उपोषण स्थगित!

सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्रीला रवाना!

मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच बाबूंचे बुल्डोझरास्त्र!

‘राम वन गमन पथ’ आणि ‘कृष्ण पथ गमन’ प्रकल्प राज्यात वेग घेणार!

ग्रेट निकोबारमधील हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे असल्याचे बोलले जात आहे. चीनच्या वाढत्या कुरापती रोखण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. भारताला चारही बाजूने घेरण्याचे चीनचे धोरण आहे. त्यामुळे चीनने श्रीलंकेतील हंबनटोटा बदंर ताब्यात घेतले आहे. म्यानमारमधील कोको बेटावर लष्करी तळ स्थापन करण्याच्या चीनच्या हालचाली आहेत. हे बेट अंदमान निकोबार समुहापासून केवळ ५५ किमी अंतरावर आहे. त्यामुळे हिंद महासागरातील चीनच्या वावराला चाप लावण्यासाठी भारताने अंदमान निकोबार बेट समुहातील ग्रेट निकोबार बेटावर महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. शिवाय संरक्षण, पर्यटन आणि व्यापार या तिन्ही दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा आहे. त्यामुळे काँग्रेसच्या विरोध करण्याच्या भूमिकेवर टीकास्त्र डागण्यात येत आहे.

Exit mobile version