मणिपूर मुख्यमंत्र्यांच्या वडिलोपार्जित घरावर हल्ल्याचा प्रयत्न!

विद्यार्थ्यांच्या हत्येनंतर वातावरणात तणाव

मणिपूर मुख्यमंत्र्यांच्या वडिलोपार्जित घरावर हल्ल्याचा प्रयत्न!

मणिपूरमध्ये दोन विद्यार्थ्यांचे अपहरण करून त्यांची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे. या हत्येच्या निषेधार्थ इम्फाळमध्ये शेकडो विद्यार्थी रस्त्यांवर उतरल्याने तणावाची परिस्थिती उद्भवली होती.

आंदोलक आणि सुरक्षा दलामध्ये गुरुवारीदेखील हिंसाचार झाल्यामुळे परिस्थिती अधिक चिघळली. ज्या विद्यार्थ्यांची हत्या झाली, ते मैतेई समाजाचे असल्याचे समजते. या विद्यार्थ्यांच्या हत्येचा जलदगतीने चौकशी करावी, अशी मागणी करत शेकडो नागरिक इम्फाळच्या रस्त्यांवर उतरले आहेत. या हत्येच्या निषेधार्थ मंगळवारपासून सुरू झालेल्या आंदोलनांनी हिंसक वळण घेतले आहे.

हे ही वाचा:

कुख्यात गुंड आतिकच्या भावाच्या बेनामी संपत्तीची रहस्ये उलगडली

तरुणाने आत्महत्येचे पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला हेरले!

‘कॅनडा म्हणजे मारेकऱ्यांचा गड’!

राजस्थानमध्येही भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी?

इम्फाळ पूर्वेकडील हेनगांग परिसरात मोठ्या संख्येने जमलेल्या जमावाने मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या वडिलोपार्जित घराकडे मोर्चा वळवला. मात्र सुरक्षा दलाने या आंदोलकांना रोखले. त्यामुळे सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला. ‘इम्फाळमधील हेनगांग परिसरात मुख्यमंत्र्यांच्या वडिलोपार्जित घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. सुरक्षा दलांनी जमावाला घरापासून सुमारे १०० मीटर अंतरावर रोखले,’ असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
६ जुलैपासून बेपत्ता असणाऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहांची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच मणिपूरमध्ये आंदोलन उग्र झाले. प्रक्षुब्ध जमावाने बुधवारी मणिपूरचे भाजपचे कार्यालय पेटवून दिले.

त्यानंतर त्याचदिवशी अनेक विद्यार्थी संघटनांनी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या तीव्र कारवाईविरोधात ठिकठिकाणी आंदोलने केली. सहा विद्यार्थ्यांची हत्या झाल्याचे उघडकीस आल्यानंतर राज्यात सुरू असलेल्या अपहरणाच्या घटना, हत्या आणि सुरक्षा दलाच्या कठोर कारवाईच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात आली. आंदोकांनी इंडो-म्यानमार रोडवेजही बंद पाडला आणि महामार्गावर टायर पेटवून दिले. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलाला अश्रुधुराचा मारा करावा लागला. मात्र संतप्त जमावाने सुरक्षा दलावर दगडफेक केली. संतप्त जमावाने इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील उपायुक्तांच्या कार्यालयाचीही नासधूस केली.

Exit mobile version