मुंबई आणि उपनगरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांमध्ये अनेक दुचाकी स्वारांनी आपला जीवही गमावला आहे. काही दिवसांपूर्वीच घोडबंदर रोडवरील खड्ड्यांमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला होता. महापालिकेच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा निषेध करण्यासाठी आणि खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने ५०० खड्ड्यांच्या प्रदर्शनाच्या माधमातून श्रद्धांजली वाहण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठाण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे प्रदर्शन शुक्रवारी (२४ सप्टेंबर) आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात ठाणे शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची छायाचित्र काढून ती प्रदर्शनात मांडली होती. अशी तब्बल ५०० चित्रे लावण्यात आली होती. खड्डे लवकरात लवकर बुजवले गेले नाही तर, या खड्ड्यांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना धडा शिकवला जाईल, असा इशारा मनसे जनहित व विधी विभाग शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी महापालिकेला दिला.
ही वाचा:
पाकिस्तान, तात्काळ पीओके सोडा!
अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाप्रमाणेच ऑलिम्पिक संघटनेत दोन-दोन वर्षे खजिनदार
४ ऑक्टोबरपासून शाळांमध्ये होणार किलबिलाट
आरोग्य विभागाच्या महाभरतीचा महागोंधळ!
ठाणे शहरातील मुख्य मार्ग आणि अंतर्गत मार्गांवर रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. घोडबंदर रोड, वागळे इस्टेट, वर्तक नगर, माजिवाडा, बाळकुम, कोपरी परिसरात रस्त्यांची चाळण झाली आहे. दरवर्षी महापालिकेकडून रस्त्यांच्या डागडुजीसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. तरीही रस्त्यांची परिस्थिती सुधारत नाही. शहरातील प्रमुख रस्ते आणि उड्डाणपुलांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सामन्य नागरिकांचा यात नाहक बळी जात आहे. रस्त्याच्या डागडुजीसाठी पेव्हर ब्लॉकचा उपयोग करण्यास मनाई असताना, अनेक ठिकाणी न्यायालयाच्या या आदेशाला डावलून पेव्हर ब्लॉकचा वापर केलेला दिसून येत आहे. त्यामुळे या संदर्भात आवाज उठविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून असे अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले होते.