मुंबईत रविवार रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईची लाईफलाईन समजली जाणरी मुंबईची लोकल ट्रेनही पावसामुळे ठप्प पडली आहे. रस्ते वाहतूक आणि लोकल वाहतूक अशा दोन्हींवर पावसाचा परिणाम झाला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने कार्यालये गाठणाऱ्या माणसांना चांगलाच मनस्ताप दिला आहे. अशातच मुंबईच्या जोरदार पावसाचा फटका राज्यातील काही आमदारांनाही बसला आहे.
राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे. त्यामुळे राज्यातील आमदार आपापल्या मतदार संघातून मुंबईकडे रवाना झाले होते. काही आमदार हे रेल्वेने मुंबईला येत होते. मात्र, मुंबईत झालेल्या पावसाचा फटका लांब पल्ल्यांच्या गाड्यांनाही बसला असून अनेक रेल्वे गाड्या मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांवर अडकून पडल्या आहेत. याचाच फटका या आमदारांना बसला आहे.
रेल्वे ट्रॅकवर पाणी भरल्यामुळे कुर्ला काही एक्स्प्रेस गाड्या थांबून राहिल्या आहेत. विदर्भ, अमरावती एक्स्प्रेसमधून हे आमदार प्रवास करत होते. आमदार संजय गायकवाड, अमोल मिटकरी, जोगेंद्र कवाडे, अनिल पाटील आणि इतर सात आमदार या गाड्यांमध्ये होते. शिवाय कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांचाही समावेश होता. मात्र, गाडी पुढे सरकतच नसल्याने या आमदारांनी अखेर रेल्वे रुळावरून चालत रेल्वे स्थानक गाठल्याची माहिती आहे. हे आमदार सध्या कुर्ला स्थानकात आहेत.
हे ही वाचा:
पावसाने मुंबईला झोडपलं; रेल्वेसेवा खोळंबली, रस्ते वाहतूक धीम्या गतीने
‘हाथरसच्या गर्दीत विषारी वायूचे कॅन उघडल्याने लोक गुदमरले’
महुआ मोईत्रांना वक्तव्य भोवणार, एफआयआर दाखल!
‘मलाही विश्वचषक विजेत्यांसारखा सन्मान हवा!..’
रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे पहाटे भांडूप, विक्रोळी, सायन, कुर्ला, दादर या ठिकाणी पाणी साठल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेस ट्रेन्सही उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही उशिराने आणि धीम्या गतीने सुरू आहे.