भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरमधील हिललाइन पोलिस ठाण्यातच गोळीबार केला होता.जमिनीच्या वादासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी जमले असताना गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.या घटनेनंतर गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘टीव्ही ९’ मराठीने दिलेल्या बातमीनुसार, जमिनीच्या प्रकरणात गावकऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला.आमदार गणपत गायकवाड यांच्यासह आठ जणांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.आमदार गणपत गायकवाड यांनी ३१ जानेवारी रोजी दुपारी १.०० वाजेता जातीवाचक शिविगाळ केली, असा आरोप शेतकऱ्यांनी केला.नीता एकनाथ जाधव असे तक्रारदाराचे नाव आहे.
हे ही वाचा:
लडाखमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले!
मेरठमधून पाकिस्तानी आयएसआय एजंटला एटीएसकडून अटक!
भावनगरमध्ये एकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार
काँग्रेस सरकारच्या धोरणामुळे दक्षिण भारताला झुकते माप, उत्तरेतील राज्ये मागे पडली
तक्रारीनुसार, ३१ जानेवारी रोजी गणपत गायकवाड आणि इतरांनी आमच्या जागेवर कंपाउंड करण्याचे काम सुरु केले होते.त्यांना आम्ही जाब विचारत विरोध केला असता गणपत गायकवाड यांनी आम्हास मारण्यासाठी फावड्याचा दांडका उचलला. त्यानंतर जातीवाचक शिविगाळ केली, असे तक्रारीत नमूद केले आहे.त्यानुसार गणपत गायकवाडसह जितेंद्र पारीक, विठ्ठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल, नगेश वारघेट अशा आठ जणांवर ॲट्रॉसिटीचा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, गोळीबार घटनेनंतर गणपत गायकवाड यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.यावेळी न्यायालयाने गणपत गायकवाड यांना ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.