28 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरविशेषयेथ चातुर्य शहाणे झाले

येथ चातुर्य शहाणे झाले

Google News Follow

Related

आपण मुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाही. माझ्या ऐवजी श्री. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले, त्यावेळी ‘समोर आलेली सत्ता नाकारण्याकरिता संघाचे संस्कार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे काळीज लागतं’ असे ट्विट मी तत्काळ केले होते.

मुख्यमंत्रीपद हे चालून आलेले असताना केवळ हिंदुत्वाच्या विचाराकरिता आणि सत्तेपेक्षा समाज बदलणे ही प्राथमिकता असल्याचा संस्कार कायम मनावर बिंबवला गेला असल्यानेच त्यांनी हे पाऊल उचलले. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या महिन्याभरात अनेक नाट्यमय घटना घडल्या. त्या घटनांचा क्लायमॅक्स श्री. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यात झाला. मा. पंतप्रधान आणि पक्षाचा आदेश मानून देवेंद्र फडणवीस यांनी हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले आणि कामकाजास सुरुवात झाली.

राज्यसभा निवडणुकीची तिसरी जागा असो किंवा विधान परिषदेचे पहिल्या क्रमांकाचे एकही मत नसताना भाजपाने जिंकलेली पाचवी जागा असो, या दोन्ही निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीसांचे कसब हे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या लक्षात आले. केवळ स्वतःचा सर्वपक्षीय असलेला संपर्क, सर्व पक्षाच्या आमदारांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी असलेली आत्मीयता, आदर, पाच वर्षाच्या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीतील त्यांनी सर्वपक्षीय आमदारांशी, कार्यकर्त्यांशी असलेले वर्तन त्यामुळेच राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीत हे यश भाजपा संपादन करू शकली. पाच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालखंडात असेल किंवा गेल्या अडीच वर्षाच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या कालखंडात असेल, देवेंद्रजींना अत्यंत जवळून पाहण्याची, त्यांचे अवलोकन करण्याची संधी मला प्राप्त झाली. ब्रायन ट्रेसी या कॅनेडियन लेखकाने आदर्श नेत्याचे पुढील भाषेत वर्णन केले आहे. Become the kind of leader that people would follow voluntarily, even if you had no title or position. देवेंद्रजी या वर्णनाला साजेसे आहेत. मुख्यमंत्रीपदी असताना कदाचित कोणीही चांगलं वागेल कारण सगळ्या यंत्रणा हातात असतात. कुठलीही शंका नसताना जनतेचे आशीर्वाद प्राप्त झाले असतानाही मुख्यमंत्रीपदाच्या ऐवजी थेट विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देवेंद्रजींवर आली. खरं तर जनादेशाचा विश्‍वासघात झाल्यामुळेच मुख्यमंत्रीपद त्यांच्यापासून हिरावले गेले. पण देवेंद्रजींचे वैशिष्ट्य हे की पहिल्या दिवसापासून ते विरोधी पक्षनेतेपदाच्या भूमिकेत केवळ शिरले नाहीत तर त्याप्रमाणे त्यांनी व्यवहार केला, म्हणूनच पहिल्या दिवसापासून विधिमंडळात आणि विधिमंडळाच्या बाहेर या सरकारवर, मुख्यमंत्र्यांवर कठोर टीका सुरू केली. ज्या व्यक्तीने महाराष्ट्राशी विश्‍वासघात करून जनतेच्या आशीर्वादाने मिळालेल्या मुख्यमंत्रीपदाचा घास हिरावून घेतला त्या व्यक्तीविषयी देवेंद्रजींनी जाहीरपणे तर सोडाच, पण खाजगीत सुद्धा कधी कडवट, अश्लाघ्य भाषा वापरली नाही. मला देवेंद्रजींचा हा गुण, हे रूप मोहून गेलं आहे. एखाद्याकडून एवढा मोठा विश्वासघात झाला असताना त्या व्यक्तीबद्दल किमान खाजगी संभाषणात अद्वातद्वा सहज बोलले जाते. परंतु देवेंद्रजींनी अडीच वर्षामध्ये एकही वावगा शब्द काढला नाही, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

विरोधी पक्षनेते झाल्यानंतर नागपूरचे अधिवेशन हे पहिलं अधिवेशन होतं. त्या अधिवेशनानंतर प्रथेप्रमाणे विरोधी पक्षनेत्याची म्हणजेच देवेंद्रजींची पत्रकार परिषद झाली. स्वाभाविकच त्या पत्रकार परिषदेत त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्षमतेविषयी, त्यांच्या विधानसभेतील कामकाजाविषयी, त्यांच्या भाषणाविषयी पत्रकारांनी प्रश्‍न विचारल्यानंतर देवेंद्रजींचं उत्तर हे केवळ महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या संसदीय राजकारणाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखं आहे. देवेंद्रजींनी टीकेचा एक शब्द सुद्धा न उच्चारता एवढंच म्हटलं, “उद्धव ठाकरे यांचे हे पहिलंच अधिवेशन होतं. त्यामुळे यावर मी कुठलेही भाष्य करणार नाही, त्यांनी चूक केली असेल तर ती चूक सुद्धा त्यांना क्षम्य आहे.” जनतेने मुख्यमंत्रीपद देऊन सुद्धा हे पद ज्या माणसामुळे हुकलं होतं त्या माणसाविषयी, त्याच्या विधानसभेतल्या कार्यक्षमतेविषयी असे जाहीर उद्गार काढण्याकरिता प्रगल्भ मानसिकता, अत्यंत संस्कारी मनच हवे. याच भावनेतून पहिले २-३ महिने देवेंद्रजींनी या सरकारवर कठोर टीका करणं टाळलं. कोविडचे संकट आल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना मुख्यमंत्र्यांनी हे अधिवेशन लवकरात लवकर आपल्याला संपवणं आवश्यक असल्याचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा याचे राजकारण न करता ‘वयम पंचाधिकम शतम’ या भावनेने देवेंद्रजींनी तत्काळ त्याला पाठिंबा दिला. सरकारवर टीका करणे थांबवले. पत्र व्यवहार, ट्विटरच्या माध्यमातून सरकारला सूचना करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. संकट आल्यानंतर ‘वयम पंचाधिकम शतम’ हीच आपली संस्कृती आहे. राजकारणामध्ये आपण महाराष्ट्राच्या जनतेला उत्तरदायी आहोत, सत्ता येणं-जाणं खरं तर हिसकावून घेणं हा आपल्या नशिबाचा एक भाग आहे, पण आपण जनतेच्या सेवेकरीता आहोत या भावनेचा विसर पडू न देता देवेंद्रजी अत्यंत सहजतेने विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत गेले.

संकटकाळात जो जनतेच्या मदतीकरता धावून जातो तोच खरा नेता अशी नेतृत्वाची व्याख्या केली जाते. उभ्या महाराष्ट्राने पाहिलं की कोरोनाच्या संकटामध्ये देवेंद्रजींनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, पायाला भिंगरी लावत चांद्यापासून बांद्यापर्यंतचा महाराष्ट्र पालथा घातला. प्रत्येक जिल्हाधिकार्‍यांशी ते बोलले, जिल्हा रुग्णालयात गेले. विरोधी पक्षनेता या नात्याने सरकरावर, प्रशासनावर अंकुश ठेवणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून देवेंद्रजींनी महाराष्ट्राचा दौरा केला. “दुर्दैवाने मला कोविड झालाच तर मी सरकारी रुग्णालयात दाखल होईन, मी कुठल्याही खाजगी रुग्णालयात दाखल होणार नाही. कारण जनतेचा, सर्वसामान्य लोकांचा सरकारी रुग्णालयावरचा विश्‍वास वाढला पाहिजे. जर नेतेच सरकारी हॉस्पिटलमध्ये जात नसतील तर जनतेचा विश्‍वास कसा बसेल” असे जाहीरपणे सांगत दुर्दैवाने कोविड झाल्यानंतर “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” या ओवीप्रमाणे देवेंद्रजी खासगी रुग्णालयामध्ये दाखल न होता सेंट जॉर्ज या शासनाच्या रुग्णालयात दाखल झाले. आधीच काही व्याधी असताना सरकारी रुग्णालयात कोरोनावरील उपचारासाठी दाखल होण्याकरीता वाघाचं काळीज लागते. कोरोना संकटकाळात राज्य सरकार असंवेदनशीलपणे वागू लागले. सामान्य जनता, आमदार एवढेच नव्हे तर विरोधी पक्षनेत्यांच्या पत्राला उत्तर देण्याचे सौजन्यही तत्कालीन मुख्यमंत्री दाखवत नव्हते, संसदीय परंपरेच्या मूलभूत शिस्तीचं पालन करत नव्हते, हे लक्षात आल्यानंतर मात्र देवेंद्रजींनी या सरकारवर जनतेचा प्रतिनिधी म्हणून आग ओकण्यास सुरुवात केली. सरकार कोरोनाचे मृत्यू कसे लपवत आहे, आरोग्य यंत्रणा किती बेपर्वाईने वागते आहे, हे आपल्या दौर्‍यातून आणि ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी प्रखरपणे मांडले. ठाकरे सरकारने सत्तेवर आल्यानंतर पहिल्या दिवसापासून अभूतपूर्व सूडबुद्धीचे राजकारण चालू केलं. देवेंद्रजींच्या काळातील निर्णयांची चौकशी करण्याची घोषणा झाली. ‘कर नाही त्याला डर कशाला’ या उक्तीप्रमाणे देवेंद्रजींनी विधानसभेत आणि बाहेरही सरकारला ठणकावून सांगितलं की, तुम्ही आमच्या पाच वर्षातल्या कुठल्याही निर्णयाची, कुठल्याही फाईलची चौकशी करा, त्या चौकशीला आम्ही तयार आहोत. भाजपा आणि ते स्वतः या चौकशीला सर्व प्रकारचे सहकार्य करतील. याचं कारण त्यांच्या काळात कोणताही गैरप्रकार झालाच नव्हता. जलयुक्तशिवार, वृक्षलागवड याबाबतची चौकशी कालबद्ध मर्यादेत पूर्ण करा, असा आग्रहही देवेंद्रजींनी धरला. ठाकरे सरकारने सूडबुद्धीने भाजपा नेत्यांना विविध प्रकरणात अडकवण्याचा कट कसा रचला होता याचा गौप्यस्फोट देवेंद्रजींनी सज्जड पुराव्यानिशी विधानसभेत केला. देवेंद्रजींनी सादर केलेले पुरावे पाहून महाविकास आघाडी सरकारच्या कर्त्या-करवित्यांची वाचा बसली. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण जाण्यामागे आधीच्या सरकारचा नाकर्तेपणा कसा आहे हे देवेन्द्रजींनी दाखवून दिले. कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता या दोन्ही समाजाला कसा न्याय मिळेल यासाठी सतत प्रयत्न केले. सचिन वाझेचं जिलेटीन कांड्या ठेवण्याचं प्रकरण, कोरोनाकाळातील गैरव्यवहार, बदल्यांमधील भ्रष्टाचार या सर्व बाबतीत देवेंद्रजींनी अत्यंत तडफेने या सरकारचा नाकर्तेपणा वेशीवर टांगला. कोरोना कालखंडामध्ये विधानसभेची अधिवेशने फार कमी कालावधीची झाली. या अधिवेशनामध्ये देवेंद्रजींनी संसदीय राजकारण कसं करायचं, उत्कृष्ट संसदपटू म्हणून कसं काम करायचं, याचा आदर्श ठेवला. विरोधी पक्षनेता म्हणून अंतिम आठवडा प्रस्तावावर केलेले भाषण, सरकारी प्रस्तावावरचे भाषण, अर्थसंकल्पावरचं भाषण अशा प्रत्येकवेळी अत्यंत संयमित शब्दांमध्ये, सरकारचे वाभाडे काढले. टीका करण्याआधी त्यांनी आघाडी सरकारला सत्तेत आल्यावर सुरुवातीच्या काळामध्ये पुरेसा वेळही दिला. अडीच वर्षांमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून बोलत असताना त्यांना विधानसभेमध्ये ना आपले शब्द मागे घ्यावे लागले ना तत्कालीन सत्ताधारी पक्षाच्या कोणालाही तुम्ही चुकीचं बोलत आहात असं म्हणण्याचं धाडस करता आलं नाही. कारण देवेंद्रजी विधानसभेत पूर्ण तयारीनिशी यायचे. महाराष्ट्रातल्या १३ कोटी जनतेच्या हिताचा विचार करायचा आहे याच भावनेने त्यांची कृती, त्यांचे शब्द विधानसभेत प्रगट होत असत. सचिन वाझे प्रकरणामध्ये उभ्या महाराष्ट्राने त्यांचं रौद्र स्वरूप पाहिलं. अनेक धमक्या आल्या, अनेकांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीका केली,

समाजमाध्यमांवरून त्यांच्या विरोधात घाणेरड्या, अश्‍लील भाषेत त्यांच्यावर टीका झाली. पण देवेंद्रजी ना डगमगले ना त्यांचा तोल ढळला. या कालखंडात राज्याच्या १३ कोटी जनतेचं हित आपल्याला जपायचे आहे, याचा त्यांनी विसर पडू दिला नाही. नवख्या, अनुभवी आमदारांना विधानसभेच्या कामकाजामध्ये भाग घेण्याची संधी मिळाली पाहिजे याकडेही त्यांचे कटाक्षाने लक्ष असायचं. कुठल्या विषयावर कसं बोललं पाहिजे याचं मार्गदर्शन माझ्यासारख्या सदस्यांना सातत्याने करत होते. त्यामुळे विधानसभेतील भारतीय जनता पार्टीची कामगिरी नेहमीच चांगली राहिली. आपण एका संघाचे कर्णधार आहोत, हे न विसरता त्यांनी सर्वांना बरोबर घेत सरकारच्या विरोधामध्ये सभागृहात, सभागृहाबाहेर संघर्ष केला.

त्यांच्या नेतृत्वगुणांचा कळस राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी दिसला. राज्यसभेची तिसरी जागा निवडून आणणं हे हिमालय चढण्याइतकंच कठीण होतं. पण तिसरी जागाही भाजपाने जिंकली. त्यांचे वैशिष्ट्य हे आहे की ते बोलतात फार कमी, प्रत्यक्ष कार्यावर त्यांचा अधिक विश्वास आहे. या दोन्ही निवडणुकीतील पसंती क्रमाच्या मतदान पद्धतीचा अभ्यास करत त्यांनी महाविकास आघाडीला लिलया पराभूत केले. सर्वपक्षीय आमदारांशी असलेल्या वैयक्तिक संबंधाचा कुशलतेने उपयोग करत राज्यसभेची तिसरी जागा त्यांनी भाजपाकडे खेचून आणली. बुद्धी चातुर्याचा वापर करत त्यांनी महाविकास आघाडीला चारीमुंड्या चीत केले. येथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रूचीसी आले, या ज्ञानेश्वरीच्या ओळीतील प्रत्यय देवेंद्रजींनी आणून दिला. या दोन्ही निवडणुकीतील रणनिती आखताना त्याची काटेकोर अंमलबजावणी होईल, याकडेही त्यांनी लक्ष दिले. या दोन्ही निवडणुकीच्या काळात ते कधीच चिडलेले कोणी पाहिले नाही. परिस्थिती कठीण असताना न डगमगता, चेहर्‍यावर कुठलीही चिंता न दिसू देता शांतपणाने, संयमाने त्यांनी विजयश्री खेचून आणली. देवेंद्र फडणवीस ही काय चीज आहे याचा प्रत्यय त्या विजयानंतर पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेमुळे आला. हा विजय लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या आजाराशी झुंजणार्‍या दोघा आमदारांना समर्पित करत त्यांनी आपले पाय अजून जमिनीवरच आहेत हे दाखवून दिले. सत्तांतर झाल्यावर आपण या सरकारमध्ये सामील होणार नाही, असे देवेंद्रजींनी जाहीर केले होते. मात्र केंद्रीय नेतृत्वाने ठरवलं की देवेंद्रजींनी या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी होणे आवश्यक आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी, राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी तसेच मा. अमितभाई शहांनी त्यांना दूरध्वनी केले. देवेंद्रजींनी एका क्षणाचा विलंब न लावताही या गोष्टीला कसा होकार दिला, याचा मी साक्षीदार आहे. पक्ष मला एखादा आदेश देतो तेव्हा तो पाळल्याशिवाय मला पर्याय नाही, अशा शब्दात त्यांनी आपल्यासाठी पक्ष हा सर्वोच्च आहे, हे दाखवून दिले. विधीमंडळ गटनेता म्हणून सरकारमध्ये सामील न होण्याचा माझा निर्णय मी जाहीर केला होता. मात्र पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे, हे देवेंद्रजींचे शब्द अत्यंत मोलाचे आहे. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यापासून ते पुन्हा जनतेच्या सेवेत मग्न झाल्याचे उभा महाराष्ट्र बघतो आहे. पूरपरिस्थितीची पाहणी असो किंवा मुंबई मेट्रोसारख्या रखडलेल्या प्रकल्पांना पुन्हा गती देण्याचं काम असो, बैठकांवर बैठका घेण्याचे सत्र देवेंद्रजींनी चालू केलं आहे.

मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मनोगत’मध्ये प्रसिद्ध झालेला मुंबई भाजपा प्रभारी आणि आमदार अतुल भातखळकर यांचा देवेंद्रजींच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा लेख प्रसिद्ध करत आहोत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा