पाच हजार किमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे बाळगणाऱ्या जगातील मोजक्या देशांच्या पंगतीत स्थान मिळवताना भारताने सोमवारी ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची बहुलक्ष्यभेदी प्रक्षेपकाच्या (एमआयआरव्ही) साह्याने ‘मिशन दिव्यास्त्र’ नावाने यशस्वी ‘फ्लाइट’ चाचणी घेतली. या मोहिमेचे नेतृत्व केले ते संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील (डीआरडीओ) आर. शीना राणी या महिला शास्त्रज्ञाने.
५७ वर्षीय शीना राणी या डीआरडीओच्या हैदराबादस्थित अद्ययावत यंत्रणा प्रयोगशाळेच्या (एएसएल) प्रकल्प संचालक आहेत. त्यांनी या क्षेपणास्त्र प्रकल्पाचे नेतृत्व केले. डीआरडीओच्या एएसएल प्रयोगशाळेच्या त्या असोसिएट संचालकही आहेत. या प्रयोगशाळेने आतापर्यंत विविध अग्नी क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत. राणी यांनी याआधी इस्रोच्या विक्रम साराभाई अंतराळ संशोधन संस्थेत आठ वर्षे काम केले आहे. त्यानंतर सन १९९८मध्ये पोखरणमध्ये अणुचाचणी केल्यानंतर सन १९९९मध्ये त्या डीआरडीओमध्ये रुजू झाल्या.
तिथपासून त्या देशाच्या महत्त्वाकांक्षी अशा अग्नी क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी काम करत आहेत. या क्षेपणास्त्र कार्यक्रमांतर्गत विविध अग्नी क्षेपणास्त्रे विकसित होऊन संरक्षण दलात दाखल झाली असली तरी हे नवे एआयआरव्ही तंत्रज्ञान असलेल्या क्षेपणास्त्राची मोहीम फत्ते केल्याने त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ही मोहीम तडीस नेण्यासाठी त्यांनी त्यांच्या टीमसोबत अहोरात्र मेहनत घेतली. त्यांच्या टीममध्ये अनेक महिला शास्त्रज्ञांचाही समावेश आहे. ‘देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या क्षेपणास्त्रनिर्मितीमध्ये माझेही योगदान असल्याबद्दल मला मोठा अभिमान वाटतो,’ असे शीना राणी यांनी मोहीम यशस्वी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना सांगितले.
हे ही वाचा:
देशभरात १७ सप्टेंबर ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ म्हणून साजरा होणार
पाकिस्तानी नागरिक म्हणातायत, पंतप्रधान मोदींना सलाम!
लोकसभा निवडणूक : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक संपली; ९० उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब!
उमेश गुप्ता स्पार्टन न्यूट्रिशन्स मुंबई श्रीचा विजेता
थिरुवनंतपूरममध्ये जन्मलेल्या राणी यांचे संगोपन त्यांच्या आईने केले आहे. त्या दहावीत असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. ‘माझी आई माझ्या आणि माझ्या बहिणीच्या आयुष्यातील आधारस्तंभ आहे,’ असे त्या सांगतात. राणी यांनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग त्रिवंद्रम (सीईटी) येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विषयात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी अग्नि क्षेपणास्त्राशी संबंधित डीआडीओच्या विविध विभागांत काम केले आहे. मात्र त्यांचे प्रमुख काम आहे ते, क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्याआधी त्याची व्यवस्थित तपासणी करून ते प्रक्षेपणास योग्य आहे की नाही ते ठरवणे.
‘क्षेपणास्त्र प्रक्षेपणाची तयारी करताना माझ्या पोटात गोळा आला होता. मात्र मला ती भीती सर्वांसमोर व्यक्त करायची नव्हती,’ असे त्या म्हणाल्या. राणी यांचे पती पीएस आर एस शास्त्री हेदेखील डीआरडीओमध्ये क्षेपणास्त्राचे काम बघतात. डीआरडीओमध्ये असताना राणी यांनी अनेक पुरस्कार मिळवले आहेत. सन २०१६मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक म्हणून गौरवण्यात आले होते.