काश्मीरमध्ये रंगणार ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा!

१४० देशांमधील स्पर्धक स्पर्धेत सहभागी होणार

काश्मीरमध्ये रंगणार ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा!

प्रसिद्ध ‘मिस वर्ल्ड’ ही स्पर्धा यंदा काश्मीरमध्ये होणार आहे. मंगळवार. २९ ऑगस्ट रोजी श्रीनगरमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत ‘मिस वर्ल्ड- २०२३’  स्पर्धेबाबत घोषणा करण्यात आली. या पत्रकार परिषदेत मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलाव्स्की, मिस इंडिया सिनी शेट्टी, मिस वर्ल्ड कॅरिबियनएमी पेना, मिस वर्ल्ड इंग्लंड जेसिका गगेन, मिस वर्ल्ड अमेरिका श्री सैनी आणि मिस एशिया प्रिसिलिया कार्ला सपुत्री युलेस या उपस्थित होत्या.

१४० देशांमधील स्पर्धक यावेळी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. नोव्हेंबर किंवा डिसेंबर २०२३ मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे.

“काश्मीर हे मिस वर्ल्डसारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. याठिकाणी सर्व काही आहे. भारतातील हे सुंदर ठिकाण असून येथे मिळालेला पाहुणचार अप्रतिम होता. या स्पर्धेत १४० देश सहभागी होताना पाहणे हे रोमांचकारी ठरेल. प्रत्येक ठिकाणाचे स्वतःचे सौंदर्य असते,” असं मत कॅरोलिना बिलाव्स्कीनं पत्रकार परिषदेत मांडले.

मिस इंडिया सिनी शेट्टी ही यावेळी म्हणाली की, “मिस वर्ल्ड २०२३ काश्मीरमध्ये होणार आहे हा अभिमानाचा क्षण आहे. हा क्षण दिवाळी सणासारखा असेल कारण तब्बल १४० देश भारतात येणार आहेत आणि एक कुटुंब म्हणून स्पर्धेत सहभागी होत आहेत.”

हे ही वाचा:

२८ फुटी नटराज मूर्तीचा अडीच हजार किमी प्रवास

प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूकीत महाराष्ट्र अव्वल

सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरस्कारांच्या रकमेत दुप्पट वाढ

काँग्रेसचा शिवशक्तीला विरोध का?

जवळपास तीन दशकांनंतर मिस वर्ल्ड या स्पर्धेच्या यजमानपदाची जबाबदारी भारताकडे देण्यात आली आहे. यापूर्वी १९९६ मध्ये भारतामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाची मिस वर्ल्ड स्पर्धा ही सामाजिक कार्यांना उत्तेजन देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ऐश्वर्या राय- बच्चन, प्रियंका चोप्रा, युक्ता मुखी यांनी आतापर्यंत मिस वर्ल्ड हा सन्मान आपल्या नावे केला आहे.

Exit mobile version