टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकविजेती कामगिरी करणारी वेटलिफ्टर मिराबाई चानू हिच्यावर भारतात आल्यानंतर स्तुतीसुमनांचा वर्षाव होत आहे. आता तर मणिपूर सरकारने अनोखी भेटही दिली आहे.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेनसिंग यांनी मिराबाई चानूला नव्या नोकरीची ऑफर दिली आहे. मिराबाई आता मणिपूरच्या पोलिस विभागात अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून काम करणार आहे. तिला एक कोटी देण्याचीही घोषणा करण्यात आली होती. मिराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करीत देशाचे पदकांचे खाते उघडले.
मणिपूर सरकारने मिराबाईला हे अधिकाराचे पद सोपविले आहे. मणिपूरच्या या कर्तबगार महिलेने एकूण २०२ किलो वजन उचलण्याची कामगिरी करताना कुठेही आत्मविश्वास ढळू दिला नाही. तिने ८७ किलो स्नॅच प्रकारात तर ११५ किलो क्लीन ऍण्ड जर्क प्रकारात वजन उचलले. त्यामुळे तिच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. दरम्यान, मीराबाई चानू टोकियोहून आज भारतात परतली. दिल्ली विमानतळावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी विमानतळ कर्मचा-यांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. गार्ड ऑफ ऑनरदेखील दिला. या दरम्यान मिराची आरटी-पीसीआर चाचणीही घेण्यात आली. तिचे प्रशिक्षक विजय शर्माही मिरासोबत परत आले आहेत.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही
आता ‘हा’ भारतीय खेळाडू कोरोना पॉसिटीव्ह
कोकणासाठी पुढचे ५ दिवस धोक्याचे
एवढा ‘ज्यू द्वेष’ की ऑलिम्पिकचंही महत्व नाही
वेटलिफ्टर मीराबाई चानूने शनिवारी एकूण २०२ किलो वजन उचलून महिलांच्या ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकणारी मीरा ही भारताची दुसरी अॅथलिट आहे. यापूर्वी २००० च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने ब्राँझपदक जिंकले होते. मिराबाई चानूने टोकियोतील ऑलिम्पिकमध्ये भारताचे खाते पहिल्याच दिवशी उघडून देशाची मान उंचावली आहे. त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.