राज्यातील विशेषतः मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या ही प्रशासनासाठी चिंताजनक आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील निर्बंधांसंबंधित महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवार ७ जानेवारी रोजी माध्यमांशी संवाद साधला. रुग्णसंख्या वाढत असली तरी लॉकडाऊनचा निर्णय अद्याप घेण्यात आला नसला तरी नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. नागरिक बेफिकीर राहिल्यास मात्र आगामी काळात लॉकडाऊन लावावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
प्रशासन तयारीत आहे, मात्र म्हणून नागरिकांनी हलगर्जीपणा करून बेसावध राहू नये, असे त्यांनी सांगितले. डॉक्टर्स, बेस्टचे कर्मचारीच मोठ्या संख्येने बाधित होत असल्याने चिंता वाढल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, इतर मंत्री आणि शरद पवार हे चर्चा करून निर्णय घेणार असून संध्याकाळी सात वाजेपर्यंत निर्णय काय आहे हे स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले.
मिनी लॉकडाऊन किंवा विकेंड लॉकडाऊन लावण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, धारावीसोबतच के ईस्ट, के वेस्ट, हायराईजमधून मोठी रुग्णवाढ होत आहे. लोकलमध्येही मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होम आणि कार्यालयीन वेळेत बदल करणे हे पर्याय असल्याचे त्या म्हणाल्या. नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास मार्शल्सची गरज भासणार नाही.
हे ही वाचा:
प्लास्टिक द्या आणि चहा, वडापाव घ्या!
‘हे तर पंजाबमधील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे लक्षण’
मुंबई पालिकेकडून गृह विलगीकरणासाठी नवी नियमावली जाहीर… वाचा सविस्तर
पंजाबमध्ये मोदींचा ताफा अडवल्याचे महाराष्ट्रात पडसाद
भारतात मागील २४ तासांत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या वाढून ३ लाख ७१ हजार ६३ झाली आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आढळले आहेत. राज्यात मागील २४ तासांमध्ये ३६ हजार २६५ नव्या रुग्णांची नोंद झाली तर एकट्या मुंबईत २० हजार १८१ रुग्ण आढळून आले आहेत.