मालाड पूर्व कुरार व्हिलेज अप्पा पाडा या दाटीवाटीच्या भागात आगीची घटना घडल्यास अग्निशमन दलाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अप्पापाडा येथील आग दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाने येथे मिनी फायर स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या पी- उत्तर विभागाने या ठिकाणी जागा उपलब्ध करुन दिल्यास फायर स्टेशन बांधण्यात येईल, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख संजय मांजरेकर यांनी दिली.
चार महिन्यांपूर्वी म्हणजे १३ फेब्रुवारी रोजी दिंडोशीतील कुरार व्हीलेज, आंबेडकर नगर, वाघेश्वरी मंदिर समोर, जामऋषी नगर या वन क्षेत्रातील झोपडपट्टी परिसरांमध्ये भीषण आग लागण्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत दीड हजारांहून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या. यात एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यु झाला होता. येथील आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला अनेक अडचणी आल्या होत्या.
हे ही वाचा:
श्रद्धा वालकरला श्रद्धांजली वाहण्यासाठी मूक रॅलीचे आयोजन
चिनाई कॉलेज सुरू करण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन
१० कोटींच्या वरील कामांवर दक्षता विभाग ठेवणार वॉच
“त्र्यंबकेश्वर मंदिरामधील घुसखोरी म्हणजे मंदिरावर कब्जा करण्याचा सुनियोजित कट समजावा”
दिंडोशी मतदार संघात मालाड (पूर्व), व गोरेगांव येथे एकच अग्निशमन केंद्र आहे. कुरार, अप्पापाडा येथे दाटीवाटीचे अरुंद रस्ते असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचण्यास अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात प्रशासनाकडून कुरार व्हिलेज येथे मिनी फायर स्टेशन बांधण्यात यावे, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली होती. मिश्रा यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत अग्निशमन दलाला जागा उपलब्ध करुन दिल्यास मिनी फायर स्टेशन बांधण्यात येईल, असे मांजरेकर यांनी सांगितले.