चेन्नईत मागील काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मिचॉंग चक्रीवादळाचा जबरदस्त फटका या भागाला बसला आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दाबाच्या पट्ट्याचे उच्च दाब क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे चक्रीवादळ ‘मिचॉंग’ चेन्नईमध्ये धडकले आहे. त्यामुळे ४ डिसेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत देशभरात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अनेक भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीसाठी भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या २४ तासांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे.
मिचॉंग वादळाचे संकट लक्षात घेऊन चेन्नई विमानतळावर उतरणारी ३३ विमाने बंगळुरू विमानतळाकडे वळवण्यात आली आहेत. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशला बसत असल्याने ही खबरदारी घेण्यात आली आहे. या ३३ विमानसेवांमध्ये इंडिगो, स्पाईसजेट, इतिहाद, गल्फ एअर या कंपन्यांच्या विमानांचा समावेश आहे. तर चेन्नईला येणारी काही विमाने रद्दही करण्यात आली आहेत.
मिचॉंग चक्रीवादळामुळे येत्या २४ तासांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शिवाय या चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफने तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरी येथे २१ पथके तैनात केली आहेत. शिवाय आठ अतिरिक्त पथके राखीव ठेवण्यात आली आहेत.
हे ही वाचा:
२०२४ ला देवेंद्र फडणवीसचं मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील
तेलंगणामध्ये हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळले, दोन वैमानिकांचा मृत्यू!
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात!
अधिवेशनात पराभवाचा राग काढू नका
चक्रीवादळामुळे दक्षिण मध्य रेल्वेने १४४ गाड्या रद्द केल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी मिचॉंग वादळाच्या संदर्भात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्याशी बोलून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.