विलेपार्ले येथे १९२४ला म्हात्रे कुटुंबियांच्या घरात सुरू झालेला गणेशोत्सव यंदा शतकपूर्ती करत आहे. कालांतराने कुटुंब मुलुंडला राहायला गेले पण गणेशोत्सवात खंड पडला नाही. आता म्हात्रे कुटुंबाचा हा गणेशोत्सव २०२४या वर्षी शंभरी पूर्ण करत आहे. विशेष म्हणजे या शंभर वर्षांच्या काळात घरातील सदस्यांनीच अत्यंत देखणे असे देखावे करत गणेशोत्सवाची रौनक वाढविली आहे.
पांडुरंग म्हात्रे यांनी पार्ल्यात हा गणेशोत्सव सुरू केला. त्यांची तीन मुले व मुलगी यांनी गणेशोत्सव त्याच उत्साहात साजरा केला. त्यांचे पुत्र नरेंद्र म्हात्रे आता सेवानिवृत्त असले तरी या पुढील पिढ्यांनी गणेशोत्सवाच्या उत्साहात कधीही कमतरता येऊ दिली नाही. यंदा तर प्रभू श्रीरामाच्या अयोध्येतील मंदिराच्या गाभाऱ्याचा देखावा त्यांनी उभारला आहे. त्यामुळे गणेशाचे रूप अधिक लोभसवाणे वाटत आहे.
नरेंद्र म्हात्रे यासंदर्भात सांगतात की, आम्हाला कलेचे कोणतेही रीतसर शिक्षण नव्हते पण कला रक्तात होती त्यामुळे सगळी भावंडे घरच्या गणपतीसाठी देखावे उभारत असू. किशोर, चंद्रकांत असे आम्ही भाऊ गणेशोत्सवात रमलेले असू. किशोर हा कला संचालक असल्यामुळे तो नवनव्या संकल्पना सुचवत असे. त्यातून प्रसिद्ध रांगोळीकार रघुवीर मुळगावकर यांची हरीहर भेटीच्या रांगोळीची प्रतिकृती, १९८४ला हिरक महोत्सवानिमित्त हिऱ्यावर विराजमान गणपती, शिवाजी महाराजांचा देखावा असे अनेक देखावे प्रतिवर्षी तयार केले गेले. त्याला लोकांकडूनही कौतुकाची थाप मिळाली.
हे ही वाचा:
पत्रकार आशुतोष आणि प्रोफेसर आनंद रंगनाथन चर्चेदरम्यान एकमेकांना भिडले
कर्नाटकात ‘गणपती’ला पोलिस व्हॅनमध्ये कोंडले
गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची सांगत वकिलाला लुटणारा सापडला सिंधुदुर्गात
डॅलसमध्ये पत्रकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर डल्ला; हीच काँग्रेसची ‘लोकशाही’
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, लेखक नाटककार वसंत सबनीस यांनीही म्हात्रे यांच्या घरी गणेशाचे दर्शन घेतले आहे. एवढेच काय, कलेचा हा वारसा जन्मजात असल्यामुळे भारतरत्न लता मंगेशकर यांच्या घरीही गणपतीचा देखावा तयार करण्याचे भाग्य लाभल्याचे नरेंद्र म्हात्रे सांगतात.
शतकपूर्ती देखावा ३० जणांनी उभारला
यंदाचे गणेशोत्सवाचे १००वे वर्ष असल्यामुळे देखाव्यासाठी खास विषय निवडण्याचे ठरले. त्यातून मग अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्याचा देखावा उभारला गेला. कुटुंबातील ३० जणांनी मिळून हा देखावा उभारला. किशोर, चंद्रकांत, तन्मय, अरुण, अनिश, रिद्धी, कोमल अशा सगळ्यांचा हातभार असतो. नरेंद्र म्हात्रे यांचा पुत्र पियूष खास श्रीगणेशाची मूर्ती खड्यांनी सजवतो.