टाटा कॅन्सर सेंटरला ‘म्हाडा’ चा मदतीचा हात, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दिले शंभर फ्लॅट्स

टाटा कॅन्सर सेंटरला ‘म्हाडा’ चा मदतीचा हात, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दिले शंभर फ्लॅट्स

मुंबई येथील टाटा कॅन्सर रुग्णालयात दर वर्षी देशभरातून हजारो रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. त्या रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय नसते. त्यामुळे अशा नातेवाईकांना अनेकदा रस्त्यावर, फूटपाथवर झोपावे लागते. रुग्णांच्या नातेवाइकांची ही गैरसोय गेली अनेक वर्ष मुंबईकरांच्या परिचयाची आहे. कॅन्सर रुग्णांचा हा त्रास कमी करण्यासाठी आता ‘म्हाडा’ पुढे सरसावला आहे. म्हाडातर्फे टाटा कॅन्सर हॉस्पिटलला शंभर सदनिका देण्यात येणार आहेत. या सदनिकांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची सोय करण्यात येणार आहे. गुरुवार २५ मार्च रोजी पत्रकार परिषदेत या संबंधीची घोषणा करण्यात आली.

टाटा हॉस्पिटल मधील कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी म्हाडाने पुढाकार घेतला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून ही योजना पुढे आली आणि म्हाडाने निर्णय करत त्यानुसार कार्यवाही केली आहे. टाटा हॉस्पिटलपासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या हाजी कासम चाळ परिसरातील म्हाडा वसाहतीतील शंभर फ्लॅट्स हे टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या ताब्यात देणार येणार आहेत. गुरुवारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टाटा रुग्णालय आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत एक पत्रकार परिषद घेतली आणि या संबंधीची घोषणा केली.

हे ही वाचा:

सचिन वाझे विरोधात खंडणीची तक्रार

निर्लज्ज राहुल गांधी महिला- बुजुर्ग सन्मानाच्या बाता मारतायत

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा

सोनिया-सुप्रिया भेटीत काय घडलं?

या संपूर्ण योजनेत कोणताही राजकीय हस्तक्षेप टाळण्याचा निर्णय म्हाडामार्फत करण्यात आला आहे. त्यासाठी या शंभर सदनिकांच्या चाव्या या टाटा इन्स्टिट्यूटच्या हवाली करण्यात येणार आहेत आणि त्यांनीच पूर्ण त्याचे व्यवस्थापन करायचे आहे. चाव्या टाटा इन्स्टिट्यूटला दिल्यानंतर म्हाडाचा आणि सरकारचा त्याच्याशी कुठलाही संबंध राहणार नाही असे जाहीर करण्यात आले आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून टाटा रुग्णालयाला हे शंभर फ्लॅट्स देण्यात आले असून लवकरच हा आकडा दुप्पट म्हणजेच दोनशे करण्याचा म्हाडाचा विचार आहे.

Exit mobile version