फिफा वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेतील रोमांचकारी उपांत्य फेरीत अर्जेंटिनाने क्रोएशियावर ३-० अशी एकतर्फी मात करत अंतिम फेरीत धडक मारली. या विजयामुळे आता तिसऱ्या वेळेला वर्ल्डकप जिंकण्यासाठी अर्जेंटिना सज्ज आहे.
१३ डिसेंबरच्या रात्री लुसेल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लिओनेल मेस्सीच्या या संघाने विजय मिळविला. या सामन्यात अर्जेंटिना संघ ४-४-२ तर क्रोएशिया ४-३-३ अशा लाइनअपने उतरला होता. ३४ व्या मिनिटाला अर्जेंटिनाने आपले खाते उघडले. त्यावेळी अर्जेंटिनाला पेनल्टी शूटआऊट मिळाला. मेस्सीने त्याचे गोलमध्ये रूपांतर केले आणि १-० अशी आघाडी मिळवून दिली. ३९व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या ज्युलिअन अल्वारेजने दुसरा गोल करत क्रोएशियाच्या निराशेत भर घातली. अर्जेंटिनाने घेतलेल्या २-० आघाडीमुळे त्यांचे पारडे जड बनले. पहिल्या टप्प्यातील या वर्चस्वानंतर दुसऱ्या टप्प्यातही अर्जेंटिनानेच पकड कायम राखली. ७०व्या मिनिटाला मेस्सीने केलेल्या एका अचूक पासमुळे ज्युलिअन अल्वारेजने सुरेख गोल केला. अर्जेंटिनाची ही ३-० आघाडी क्रोएशियासाठी पराभवाचे संकेत देणारी होती. त्यानंतर क्रोएशियाला सावरणे शक्यच झाले नाही.
अर्जेंटिनाला तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्याची संधी आहे. आतापर्यंत १९७८ आणि १९८६मध्ये त्यांनी वर्ल्डकप जिंकलेला आहे. दुसरा उपांत्य सामना अल बायेत स्टेडियमवर आज बुधवारी फ्रान्स आणि मोरोक्को यांच्यात होत आहे. या स्टेडियममध्ये तब्बल ६० हजार प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतील.
क्रोएशियाने २०१८च्या फिफा वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली होती पण त्यांना वर्ल्डकप जिंकता आला नव्हता. त्यामुळे यावेळी ते अंतिम फेरी पोहोचून विजेतेपदाची आशा लावून बसले होते. मेस्सीसाठीही हा वर्ल्डकप महत्त्वाचा आहे. हा त्याचा पाचवा वर्ल्डकप असून त्याच्या उपस्थितीत हा वर्ल्डकप अर्जेंटिनाला जिंकायचा आहे.