सुप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी शनिवार, १५ जुलै रोजी अधिकृतपणे एमएलएस क्लब इंटर मियामीमध्ये सामील झाला. क्लबने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे मेस्सीला करारबद्ध केल्याची घोषणा केली.
अर्जेंटिनाचा कर्णधार आणि सर्वकाळातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेस्सी याने मेजर लीग सॉकर क्लब इंटर मियामीमध्ये सहभागी होण्यासाठी अधिकृतपणे स्वाक्षरी केली आहे. क्लबने शनिवारी त्यांच्या सोशल मीडिया आणि अधिकृत निवेदनाद्वारे ही बातमी जाहीर केली. पाच आठवड्यांपूर्वी त्याने इंटर मियामीमध्ये सामील होण्याचा आपला इरादा जाहीर केल्यानंतर, मेस्सीचा करार १५ जुलै रोजी अधिकृत करण्यात आला. हा संघ रविवारी रात्री फोर्ट लॉडरडेल येथील त्यांच्या स्टेडियमवर चाहत्यांशी त्याची ओळख करून देईल. लीग कप सामन्यात मेस्सीचा पहिला सामना शुक्रवारी सकाळी क्रूझ अझुल विरुद्ध होण्याची शक्यता आहे.
सोमवार, १७ जुलै रोजी औपचारिक वार्ताहर परिषद होणार आहे. त्यानंतर मेस्सीचे क्लबसोबतचे पहिले प्रशिक्षण सत्र मंगळवारी अपेक्षित आहे. इंटर मियामीने यापूर्वी जाहीर केले होते की, मेस्सीचा करार अडीच हंगामांचा असेल आणि त्याला वार्षिक पगार ५० ते ६० दशलक्ष डॉलरदरम्यान मिळेल. परिणामी, एकूण कराराचे मूल्य १२५ ते १५० दशलक्ष डॉलर मिळेल.
एमएलएस कमिशनर डॉन गार्बर यांनी अधिकृत निवेदनाद्वारे आपला आनंद व्यक्त केला. ‘जगातील महान खेळाडूने इंटर मियामी सीएफ आणि मेजर लीग सॉकरची निवड केली, याचा आम्हाला आनंद झाला आहे. त्याचा हा निर्णय आमच्या लीग आणि उत्तर अमेरिकेतील आमच्या खेळामागील गती आणि उर्जेचा पुरावा आहे. एमएलएस हा सर्वोत्कृष्ट खेळाडूंसाठी एक निवड असू शकते. हे लिओनेल जगाला दाखवून देईल, यात आम्हाला शंका नाही,’ असे त्यांनी म्हटले आहे.
मेस्सी अजूनही फुटबॉलमधील सर्वात मोठा स्टार आहे. सध्या तो एमएलएस ईस्टर्न कॉन्फरन्सच्या यादीत तळाशी असलेल्या संघात सामील होत आहे. केवळ चौथा हंगा खेळणाऱ्या इंटर मियामीने कधीही विजेतेपद मिळवलेले नाही. ते ज्या तात्पुरत्या त्यांच्या घरच्या स्टेडियममध्ये खेळले आहेत, त्यांचे जलद नूतनीकरण पूर्ण झाल्यावरही त्यात केवळ २२ हजार प्रेक्षक बसू शकतील.
सुट्टीनंतर मेस्सी मंगळवारी दक्षिण फ्लोरिडामध्ये आला आणि त्याने पुढील सोपस्कार पूर्ण करण्यास सुरुवात केली. बुधवारी आवश्यक शारीरिक चाचण्या आणि कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. शनिवारी दुपारी कराराला अंतिम रूप दिले जाईल. जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूला दिला जाणारा बॅलोन डी-ओर सन्मान सात वेळा मिळवणारा मेस्सी आता मियामीत सहभागी होत आहे. त्याबद्दल स्वत: मेस्सीनेही आनंद व्यक्त केला. ‘ही एक विलक्षण संधी आहे आणि आम्ही एकत्रितपणे हा प्रवास सुंदर करू. आम्ही ठरवलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एकत्र काम करणार असून मी येथे माझ्या नवीन घरात मदत करण्यास खूप उत्सुक आहे,’ अशी प्रतिक्रिया मेस्सीने दिली.