चीनच्या हँगझो येथे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे क्रिकेट संघ खेळणार आहेत. भारतीय क्रिकेट बोर्डाने याची घोषणा केली आहे. दुय्यम दर्जाचा पुरुष संघ या स्पर्धेत खेळविण्यात येईल. २८ सप्टेंबरपासून या क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होत असून त्यात पुरुषांचा दुय्यम संघ खेळणार असला तरी महिलांचा मात्र पहिल्या दर्जाचा संघच सहभागी होणार आहे. या संघाची निवडही लवकरच होणार आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात तीनवेळा क्रिकेट या खेळाचा समावेश केला गेला आहे. गेल्यावेळेस २०१४मध्ये क्रिकेट या स्पर्धेत खेळले गेले होते. पण त्यावेळी भारताने त्यात सहभाग घेतला नव्हता. याच दरम्यान वर्ल्डकप क्रिकेट भारतात होणार असल्यामुळे भारतीय पुरुषांचा संघ हा त्यात व्यस्त असेल. त्यामुळे दुय्यम दर्जाचा संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पाठविण्यात येईल.
बीसीसीआयने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक लक्षात घेता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ उतरविणे तसे सोपे नव्हते पण देशाचा विचार करता बीसीसीआयने या क्रीडा स्पर्धेत संघ उतरविण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही प्रकारात भारताला सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे. भारत सरकारच्या निर्देशांनुसार हे दोन्ही संघ या स्पर्धेत उतरविले जातील, असे बोर्डाने म्हटले आहे.
हे ही वाचा:
देशाचा विकास मुख्य उद्देश ठेऊन एकनाथ शिंदेंना साथ
भारताचे पुरी जगन्नाथ मंदिर किती श्रीमंत आहे?
पंतप्रधान संग्रहालयातून एका वर्षात मिळाला ६.८० कोटींचा घसघशीत महसूल
विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हेंचा ठाकरेंना रामराम
दरम्यान, इम्पॅक्ट प्लेअर रूलचा समावेश सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत केला जाणार आहे. १६ ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरू होत आहे. गेल्या हंगामात या नियमाचा समावेश या स्पर्धेत करण्यात आला होता. आता आयपीएलप्रमाणे नाणेफेकीच्या आधी चार बदली खेळाडूंची नावे जाहीर करायची आहेत. शिवाय, जे त्या सामन्यात खेळणारे ११ जण असतील त्यांचीही नावे जाहीर करायची आहेत. या चार बदली खेळाडूंपैकी एका खेळाडूचा इम्पॅक्ट खेळाडू म्हणून वापर करता येईल. प्रत्येक सामन्यात एका खेळाडूला दोन्ही संघ इम्पॅक्ट खेळाडू म्हणून वापर करू शकतील.