महाराष्ट्रातील प्रमुख प्रकाशन संस्था मेहता पब्लिकेशन हाऊसची जबाबदारी सांभाळणारे सुनील मेहता यांचे बुधवार १२ जानेवारी रोजी निधन झाले. सुनील मेहता यांचे ५६ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. गुरुवार १३ जानेवारी रोजी पुण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सुनील मेहता हे गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील खासगी रुग्णालयात किडनी स्टोनवरील उपचार घेत होते. अवयव निकामी झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. अखेरच्या दोन दिवसांत त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या पश्चात वडील अनिल मेहता, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
सुनील मेहता यांचे वडील अनिल मेहता यांनी १९७६ मध्ये पुण्यात स्थापन केलेल्या मेहता पब्लिशिंग हाऊस या नामांकित प्रकाशन संस्थेची जबाबदारी १९८६ मध्ये सुनील मेहता यांच्याकडे आली. सुनील यांनी अगदी थोड्याच कालावधील संस्थेला नावारूपास आणले. मराठी साहित्य तर वाचकांना मिळावं मात्र त्यासोबतच विविध भाषांमधील साहित्य मराठी भाषेत यावं म्हणून अनुवादित साहित्यालाही त्यांनी प्राधान्य दिले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित लेखकांचे साहित्य मराठीत आणण्यासाठी सुनील मेहता यांनी प्रयत्न केले.
हे ही वाचा:
फाळणीमुळे विभक्त झालेले भाऊ भेटले ७४ वर्षांनी
निळू फुले यांच्यावरील बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका कोण करणार?
महाविकास आघाडीने घेतला ‘मनसे’सारखा निर्णय
…आणि काडीपेटीची झाली साडीपेटी!
आधुनिक काळाची गरज ओळखून सुनील यांनी मराठीत सर्वप्रथम ई- बुक्सचा प्रयोग यशस्वी राबवला. मेहता पब्लिशिंग हाऊसची दीड हजारांहून अधिक पुस्तके ई-बुक स्वरूपात उपलब्ध आहेत. तसेच फ्रॅंकफर्ट येथील आंतरराष्ट्रीय बुकफेअरमध्ये आणि २०१२ मध्ये नॉर्वे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी मराठी प्रकाशन विश्वाचे प्रतिनिधित्व केले.