दिल्लीमध्ये लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असून राजधानीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो भारत कॉरिडॉरसह एकूण १२,२०० कोटी रुपयांच्या योजनांसह दिल्लीकरांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी साहिबााबाद आणि न्यू अशोक नगर दरम्यानच्या १३ किमीच्या दिल्ली- मेरठ नमो भारत कॉरिडॉरचे उद्घाटन केले. नवी अशोक नगर, दिल्ली येथून धावणारी नमो भारत ट्रेन आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून सुरू होणार आहे. पंतप्रधान मोदींनी रविवारी उद्घाटन केलेल्या इतर प्रकल्पांमध्ये जनकपुरी पश्चिम आणि कृष्णा पार्क दरम्यान पूर्ण झालेल्या मेट्रो कॉरिडॉरचाही समावेश आहे.
नमो भारत कॉरिडॉरचा हा नवीन टप्पा सुरू झाल्यामुळे दिल्ली आणि मेरठमधील प्रादेशिक कनेक्टिव्हिटीला नवा आयाम मिळाला आहे. आत्तापर्यंत साहिबााबाद आणि मेरठ दरम्यान ४२ किलोमीटरचा मार्ग कार्यरत होता. ४२ किलोमीटरच्या या मार्गावर एकूण नऊ स्थानके होती. हा नवीन टप्पा सुरू झाल्याने या मार्गाची एकूण लांबी आता ५५ किलोमीटर झाली असून त्यातील एकूण स्थानकांची संख्या ९ वरून ११ झाली आहे. नमो कॉरिडॉरच्या नवीन टप्प्यांतर्गत, दिल्लीतील न्यू अशोक नगर ते साहिबााबाद दरम्यानचा हा १३ किलोमीटरचा रस्ता तयार करण्यासाठी एकूण ४६०० कोटी रुपये खर्च झाले आहेत, अशी माहिती आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर रविवारी संध्याकाळी ५ वाजल्यापासून नमो भारत ही ट्रेन प्रत्येक १५ मिनिटांच्या अंतराने धावणार आहे. ही ट्रेन धावल्याने दिल्ली ते मेरठ प्रवासाचा वेळ एक तृतीयांश कमी होईल. आता प्रवाशांना दिल्लीहून मेरठला अवघ्या ४० ते ४५ मिनिटांत पोहोचता येणार आहे. नवीन स्ट्रेच (कॉरिडॉर) ६ किलोमीटर भूमिगत आहे, त्यात आनंद विहार स्टेशनचाही समावेश आहे. नमो भारत ट्रेन भूमिगत मार्गावर धावण्याची ही पहिलीच वेळ आहे.
हे ही वाचा..
महाकुंभमेळा परिसरात १० हजारहून अधिक रुग्णांना वैद्यकीय सेवा
बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असलेल्या एका बांगलादेशी व्यक्तीला दिल्लीतून अटक
छत्तीसगडमधील अबुझमाडमध्ये चार नक्षलवाद्यांचा खात्मा
भाजपाचे उद्या राज्यव्यापी विशेष सदस्य नोंदणी अभियान
नमो भारत ट्रेनमध्ये व्हीलचेअर आणि स्ट्रेचरसाठी विशेष जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रत्येक ट्रेनमध्ये एक अटेंडंट उपलब्ध असेल. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोचच्या आत आणि प्लॅटफॉर्म स्क्रीनच्या दरवाजावर पॅनिक बटण देखील देण्यात आले आहे. नमो भारत गाड्यांबाबत इतर टप्प्यांवरही काम सुरू आहे. न्यू अशोक नगर ते सराय काले खान आणि मेरठ दक्षिण ते मोदीपुरमपर्यंत बांधकामाचे काम वेगाने सुरू आहे. दिल्ली-गाझियाबाद आणि मेरठ नमो भारत कॉरिडॉरचे काम पूर्ण झाल्यानंतर या कॉरिडॉरची एकूण लांबी ८२ किलोमीटर होईल. या कॉरिडॉरवर गाड्या धावल्यानंतर नागरिकांना वाहतूककोंडीपासून दिलासा मिळणार आहे.