महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या १९ एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने १५ दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मेडिकलची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
या परीक्षा आता येत्या जून महिन्यात घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल. या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
संजय राऊत अमेरिका आणि इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देऊ शकतात- चंद्रकांत पाटील
कोविडच्या काळात ‘या’ कंपन्यांमध्ये हजारो नव्या नोकऱ्या
देशात कोरोना लसीचा तुटवडा नाही- डॉ. हर्षवर्धन
वाशीमध्ये उपचारादरम्यान तरुणीवर बलात्कार?
कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने राज्यसह देशभरातील विविध परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. त्यानंतर वैद्यकीय परीक्षाही पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरत होती. या पार्श्वभूमीवर अखेर सरकारी पातळीवर हालचाली झाल्या आणि वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी या परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती दिली.