वाढत्या दगदगीच्या राहणीमानामुळे महिलांमधील स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाणही वाढत आहे. अशा महिला रुग्णांना त्वरित उपचार उपचार आणि निदान उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कर्करोग बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांद्वारे ५० गावे दत्तक घेतली जातील. दत्तक घेतलेल्या गावांमधील लोकांमध्ये स्तनाच्या कर्करोगाबाबत या माध्यमातून जागरूकता निर्माण केली जाणार आहे.
राज्यभरातील ४९ वैद्यकीय महाविद्यालयांची निवड करण्यात आली आहे. या महाविद्यालयांना तपासणीसाठी विशिष्ट लक्ष्य दिले जाईल. विशेष वॉर्डमध्ये आठवड्यातून एक दिवस स्तनाच्या कर्करोगाची तपासणी केली जाईल. शिवाय, प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाला ५० गावे दत्तक घेण्याचे किंवा सुमारे २०,००० महिलांची स्क्रीनिंग करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे जेणेकरून या उपक्रमाची माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचू शकेल आणि लवकर निदान करण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण होईल अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. फ्रीप्रेस जर्नलने या संदर्भातील वृत्त दिले आहे.
कर्करोगासंदर्भात यादी तयार केली असून या ४९ वैद्यकीय महाविद्यालयांतून ३० ते ६४ वयोगटातील सुमारे १० लाख महिलांची तपासणी केली जाणार आहे. स्क्रीनिंग दोन सत्रांमध्ये आयोजित केले जातील. पहिले सत्र दोन वर्षे चालेल आणि त्या सर्वांची दोन वर्षांनी पुन्हा तपासणी केली जाईल. भारतातील ४० % स्तनाच्या कर्करोगाचे निदान प्रगत अवस्थेत होते, असे स्त्रीरोगतज्ज्ञ आणि कामा आणि अलब्लेस हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.
नवी मुंबईतील अपोलो कॅन्सर सेंटर्समधील स्तन शस्त्रक्रियेचे प्रमुख सल्लागार डॉ. नीता एस नायर यांच्या म्हणण्यानुसार अपुरी जागरुकता आणि आरोग्य सेवांच्या मर्यादित प्रवेशामुळे भारतातील ४०% पेक्षा जास्त प्रकरणांचे निदान प्रगत अवस्थेत होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, राज्य सरकारने प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात विभाग स्थापन करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील, ज्यामुळे लवकरात लवकर निदान आणि उपचार करण्यात मदत होईल असे मत डॉ. नायर यांनी व्यक्त केले.
हे ही वाचा:
मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
सर्बिया पुन्हा हादरले!! गोळीबाराच्या घटनेत आठ जणांचा मृत्यू
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री तब्बल १२ वर्षांनी भारतात, केली होती ‘ही’ भारताविरोधात वादग्रस्त विधानं
दरड कोसळल्यामुळे बद्रीनाथ महामार्ग ठप्प, हजारो भाविक अडकले
“वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तज्ञ डॉक्टर असतात जे खेड्यातील महिलांवर उपचार करतील. पहिल्या ४० पात्र महिलांना ३० मिनिटांसाठी आरोग्य शिक्षणाची माहिती दिली जाईल आणि २०मिनिटांची स्क्रीनिंगही केली जाईल. जर कोणत्याही महिलांच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर तज्ञ ताबडतोब उपचार देतील आणि प्रकरणाचा पाठपुरावा करतील असे एका अधिकाऱ्याने सांगितले.