मुंबईत वानखेडे स्टेडियमवर झालेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात १० बळींचा विक्रम करणारा न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज अजाझ पटेल याने एक अनोखी भेट मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिली आहे.
अजाझने ज्या चेंडूच्या सहाय्याने हा विक्रम केला तो विक्रमी चेंडू आणि त्याचा टी-शर्ट मुंबई क्रिकेट असोसिएशनला प्रदान केला आहे. आगामी काळात वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या संग्रहालयात हा चेंडू आणि टी-शर्ट ठेवण्यात येईल.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी अजाझला या सामन्यातील त्याने घेतलेले १० बळी नोंदविलेली स्कोअरशीट भेट दिली. त्या सत्कार कार्यक्रमात त्याने आपला तो विक्रमी चेंडू आणि टी-शर्ट मुंबई क्रिकेट असोसिएशनला भेट दिला.
अजाझ पटेलने भारताच्या १० फलंदाजांना बाद करून विक्रमी कामगिरीची नोंद केली होती. पटेलचा जन्म मुंबईतलाच असल्यामुळे त्याच्या या विक्रमाला महत्त्व प्राप्त झाले.
हे ही वाचा:
‘काही संकुचित वृत्तीची माणसे देशाला खाली खेचतात’
वानखेडे कसोटी भारताने चौथ्या दिवशीच जिंकली
राजांनी मांडलेली ‘युगत’ प्रेक्षकांच्या पसंतीस
भारताच्या संविधानाचा मसुदा ज्यावर टाईप केला त्या टाईपरायटरचे होणार जतन
१० बळी घेण्याचा विक्रम करणारा तो जगातील तिसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी, इंग्लंडच्या जिम लेकर यांनी हा विक्रम केला होता तर त्या विक्रमाशी भारताचा लेगस्पिनर अनिल कुंबळेने बरोबरी केली होती. लेकर यांनी १९५६ला हा विक्रम केला होता तर कुंबळेने दिल्लीत पाकिस्तानविरुद्ध ही विक्रमी कामगिरी केली होती. वानखेडे स्टेडियमवरील या दुसऱ्या कसोटीत अजाझ पटेलने ही कामगिरी केल्यावर भारतात अशी कामगिरी नोंदविण्याची ही दुसरी वेळ ठरली.
या १० बळींच्या विक्रमादरम्यान अजाझ पटेलला हॅटट्रिक नोंदविण्याची संधी होती पण त्याला नशिबाने साथ दिली नाही. अजाझचे या कामगिरीनंतर स्वतः अनिल कुंबळेनेही कौतुक केले होते. १० बळी घेणाऱ्या खेळाडूंच्या क्लबमध्ये तुझे स्वागत असे कुंबळेने ट्विट केले होते.