शाकाहार पूरक आस्थापनांची भरभराट होऊ शकेल तसेच मानव व इतर प्राण्यांसाठी एक उत्तम विश्व निर्माण व्हावे यासाठी पूरक वातावरण निर्मिती केल्याबद्दल पिटा इंडियाचा २०२१ या वर्षाचा सर्वाधिक शाकाहार- पूरक शहर पारितोषिकासाठी मुंबई शहराची निवड झाली असून महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी हा पुरस्कार स्वीकारला. मात्र, एका विशिष्ट आहार पद्धतीचा पुरस्कार स्वीकारल्याने महापौर वादात सापडल्या असून विरोधी पक्षाने त्यांच्यावर टीका सुरु केली आहे.
मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून आहार पद्धतीवरून वाद सुरु आहेत. काही भागांत इमारतींमध्ये मांसाहार करणाऱ्या कुटुंबांना घरे दिली जात नाहीत. या मुद्द्यावरून मुंबई महापालिका सभागृहातही वाद झाला होता. मांसाहारी कुटुंबाला घरे नाकारणाऱ्या बिल्डरवर कारवाई करण्याचा ठराव सभागृहाने मंजूर केला होता; मात्र, त्यावर अंमलबजावणी झालेली नाही.
मुंबईत असे वाद सुरु असताना महापौरांनी असा पुरस्कार स्वीकारल्यामुळे हे मुद्दे पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. ‘आपण विचाराने, आहाराने, विहाराने शाकाहारी असले पाहिजे. प्राण्यांनाही मुक्त विहार करण्याला जागा असावी या दृष्टीकोनातून मुंबई महापालिकेने प्राण्यांसाठी उद्यान तयार केले आहे. मनुष्य, प्राणीधर्म पाळून मुक्या प्राण्यांवर प्रेम करू या’, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना दिली.
हे ही वाचा:
दुबळ्या राज्यकर्त्यांमुळे दंगेखोरांचे मनोधैर्य वाढले
अनिल परब शरद पवारांच्या भेटीला
आता एसटी कर्मचारी ठोठावणार अनिल परब यांचे दार
‘महापौर या शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही प्रकारच्या मुंबईकरांच्या प्रथम नागरिक आहेत. त्यामुळे अशा प्रकारचा पुरस्कार स्वीकारणे चुकीचे आहे. महापौर शाकाहाराचा पुरस्कार करणार असतील तर कोळी बांधवांनी मासेविक्री बंद करावी का? महापौरांनी हा पुरस्कार परत करावा.’ असे समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख म्हणाले.
‘शाकाहारी- मांसाहारी असा भेद करणे आणि विशिष्ट आहारच चांगला आहे असा दावा करणे चुकीचे आहे. निसर्गाने दोन्ही पद्धतीचा आहार घेणारे लोक निर्माण केले आहेत. प्राण्यांमध्येही दोन्ही आहार घेणारे आहेत. जगा आणि जगू द्या असे तत्त्व आहे. त्यात आपण ढवळाढवळ केल्यास सृष्टीचा समतोल बिघडून जाईल,’ असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी स्पष्ट केले.