राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिकाधिक मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. उपमुख्यमंत्री पवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात गणेशोत्सव नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, गणेशोत्सव साजरा करताना वाहतुकीला अडथळा येणार नाही याची गणेश मंडळांनी दक्षता घ्यावी. मेट्रो प्रशासनाने उत्सव काळात मेट्रो सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याबाबत विचार करावा. गणेश मूर्तीच्या उंचीवर शासनाने कोणतीही मर्यादा घातलेली नाही, मात्र गणेश मूर्ती विसर्जन करताना प्रदूषण होणार नाही आणि उत्सवाचे पावित्र्य जपले जाईल याची दक्षता घ्यावी. गणेश मूर्ती संकलनात जनतेच्या भावनांना धक्का लागणार नाही याकडेही लक्ष द्यावे.
दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरविणाऱ्या प्रकल्पांना केंद्राने मदत करावी
रिलायन्सच्या बोर्डात आता इशा, आकाश, अनंत अंबानी
सरला बेट विकासासाठी १५ कोटींचा निधी
पाकिस्तानी विद्यार्थी म्हणाला, सूर्यच पृथ्वीभोवती फिरतोय!
धनकवडी भागातील मंडळांनी एकत्रितरित्या विसर्जन मिरवणूक काढण्याचा सुरू केलेला उपक्रम अनुकरणीय असून इतरही मंडळांनी तसा प्रयत्न करावा. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने रस्त्यावरील उघडे चेंबर्स बंद करण्याची कारवाई त्वरित करावी. मिरवणूक मार्गावरील रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे कामही उत्सवापूर्वी करण्यात यावे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही भागातील मार्गावर असलेली एकतर्फी वाहतूक शक्य असल्यास दुतर्फा सुरू करण्यात यावी. मानाच्या गणपतींसोबत इतरही मंडळांसोबतही खेळीमेळीचे वातावरण ठेवत त्यांच्या समस्या प्रशासनाने दूर कराव्यात. पुण्यातील गणेशोत्सव हा राज्याचा उत्सव समजून सर्वांनी यात सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.
पालकमंत्री पाटील म्हणाले, गणेश मंडळांकडून महानगरपालिकेने कमानीसाठी कोणताही कर आकारू नये. महापालिका प्रशासनाने गणेश मंडळांशी समन्वय साधून त्यांच्या समस्या दूर कराव्यात. प्रशासनाने नियंत्रण मनोरे स्थापित करून त्या माध्यमातून नियोजनावर लक्ष ठेवावे. पोलीस मित्रांना प्रशिक्षित करून त्यांची मदत घेण्याचा प्रयत्न करावा.गणेश मंडळाने स्वतः नियमावली तयार करून प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच सर्वांनी मिळून उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.