स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी नवी दिल्ली सज्ज झाली आहे. त्यामुळे सध्या दिल्लीत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुमारे एक हजार चेहरा ओळखणारे कॅमेरे (फेस रिकग्नेशन), ड्रोनविरोधी यंत्रणा आणि १० हजारांहून अधिक पोलिस लाल किल्ला आणि आसपास तैनात राहणार आहेत.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची आशा आहे. तब्बल दोन वर्षांनंतर करोनाचे प्रतिबंध यंदा नाहीत. ‘यंदा कोणत्याही करोना प्रतिबंधांशिवाय स्वातंत्र्यदिनाचा सोहळा होत असल्याने पुरेशी सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे,’ अशी माहिती विशेष पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) दीपेंद्र पाठक यांनी दिली. सुरक्षाव्यवस्था चोख ठेवण्यासाठी अन्य सुरक्षा यंत्रणांशीही समन्वय साधला जाणार आहे.
हे ही वाचा:
फाळणी अर्थात ‘विभाजन विभिषिका दिनी’ स्मरण !
जाधवपूर विद्यापीठातील आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याच्या डायरीतील पत्र चर्चेत
NEET परीक्षेतील अपयशाने मुलाचा मृत्यू; वडिलांनीही संपवलं आयुष्य !
“तुम्ही नातीगोती जपायची आणि कार्यकर्त्यांनी मारामारी करायची का?”
सुरक्षाव्यवस्था चोख ठेवण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून तंत्रज्ञानाचाही वापर केला जाणार आहे. पंतप्रधानांच्या मार्गापासून ते लाल किल्ल्याच्या परीघक्षेत्रात सुरक्षा दल आणि गुप्तचर यंत्रणा तैनात असतील. लाल किल्ल्याजवळ सकाळी ११ वाजेपर्यंत वाहनांना संपूर्णपणे प्रतिबंध असेल. केवळ आपत्कालीन आणि विशेष वाहनांना येथून जाण्यास मोकळीक असेल. रविवारी या संपूर्ण सुरक्षेची रंगीत तालीमही करण्यात आली.
शाहदरा जिल्हा पोलिस उपायुक्त रोहित मीणा यांनी रविवारी त्यांच्या पथकासह यमुना नदी किनारा परिसराचीही पाहणी केली. सर्व सीमा सोमवारपासून बंद ठेवण्यात येणार आहेत. कसून तपास केल्यानंतरच वाहनांना दिल्लीत प्रवेश करण्याची मुभा मिळेल. दहशतवादी आणि गुन्हेगारांशी संबंधित सूचना मिळाव्यात यासाठी दिल्ली पोलिस शेजारील राज्यांच्या पोलिसांच्याही संपर्कात आहे. यमुना नदीच्या परिसरात दिल्ली पोलिसांचे कमांडो, पट्टीचे पोहणारे यांचीही गस्त असेल, जेणेकरून त्या मार्गाने कोणतीही घुसखोरी होऊ शकणार नाही. १५ ऑगस्ट रोजी सर्वसामान्य लोकांना सकाळी चार वाजल्यापासूनच येथे प्रवेशबंदी असेल.