जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हिंदू पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. यात २७ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये भारतीय नौदलातील विनय नरवाल यांचाही मृत्यू झाला. दुःखद बाब म्हणजे विनय हे हरियाणाच्या कर्नाल येथील २६ वर्षीय लेफ्टनंट होते आणि त्यांचे नुकतेच लग्न झाले होते. ते आपल्या पत्नीसोबत फिरायला म्हणून जम्मू- काश्मीरमध्ये गेले होते.
माहितीनुसार, विनय नरवाल यांचे लग्न १६ एप्रिल रोजी झाले. त्यानंतर १९ एप्रिल रोजी त्यांच्या लग्नाच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम पार पडला. कोची येथे तैनात असलेले विनय नरवाल सध्या रजेवर होते आणि एका छोट्या सुट्टीसाठी काश्मीरला गेले होते तेव्हा त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ते दोन वर्षांपूर्वी भारतीय नौदलात सामील झाले होते. विनय यांच्या मृत्यूने कुटुंबाला आणि मित्रांना धक्का बसला आहे. त्यांच्या शेजाऱ्यांनी विनय हे एक उज्ज्वल भविष्य असलेले तरुण अधिकारी होते, असे म्हटले. त्यांचे नुकतेच लग्न झाले होते आणि चार दिवसांपूर्वीच लग्नाचा स्वागत समारंभ पार पडला होता. सगळे आनंदी होते. माहिती मिळाली की त्याला दहशतवाद्यांनी मारले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तो नौदलात अधिकारी होता, असे शेजाऱ्यांपैकी एक नरेश बन्सल यांनी सांगितले.
“आम्ही या ठिकाणी भेलपूरी खात होतो. त्यावेळी हातात बंदुक घेऊन व्यक्ती आला. त्याने माझ्या पतीला तू मुसलमान आहे का अशी विचारणा केली. मुसलमान नाही आहे, हे समजताच त्याने गोळी मारली,” असे विनय नरवाल यांच्या पत्नीने सांगितले.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांनी लोकांना मारण्यापूर्वी इस्लामिक श्लोक वाचण्यास सांगितले होते, अशी माहितीही समोर आली आहे. पुण्यातील ५४ वर्षीय व्यावसायिक संतोष जगदाळे यांना इस्लामिक श्लोक म्हणण्यास सांगण्यात आले होते. त्यांना ते न जमल्याने दहशतवाद्यांनी त्यांची गोळी झाडून हत्या केली, असे त्यांची २६ वर्षीय मुलगी आसावरी जगदाळे हिने सांगितले.
हे ही वाचा :
पहलगाम हल्ल्यात ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमधील तीन पर्यटकांचा मृत्यू
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाकडून जादा उड्डाणं; आणखीही सेवा उपलब्ध
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा हातात बंदूक धरलेला फोटो आला समोर
जम्मू-काश्मीर: दहशतवादी म्हणाला, ‘जा आणि मोदींना सांगा’
दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला असून दोषींना सोडणार नाही असा इशारा दिला आहे. तसेच त्यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट थांबवला आणि ते भारतात परतले आहेत. उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी योग्य कारवाईचे निर्देश दिले आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, सध्या भारताच्या अधिकृत दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.