संजौली मशिदीच्या विरोधात व्यापारीही उतरले, बाजारपेठा बंद !

पोलिसांच्या लाठीचार्ज विरोधात निषेध

संजौली मशिदीच्या विरोधात व्यापारीही उतरले, बाजारपेठा बंद !

हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला येथील संजौली येथील मशिदीमध्ये बेकायदा बांधकामावरून बुधवारी (११ सप्टेंबर)  मोठा गदारोळ झाला. संजौलीत आंदोलकांनी पोलिसांना घाम फोडला, या वेळी लाठीचार्ज आणि पाण्याच्या तोफांचा वापर करण्यात आला. यावेळी पोलीस आणि आंदोलकही जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांच्या लाठीचार्जच्या निषेधार्थ शिमल्यातील व्यापाऱ्यांनी आज बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दुकानदारांनी आपल्या दुकानांना टाळे लावून निषेध दर्शविला.

संजौली येथील बेकायदा मशीद बांधकामावरून काल हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात हिंदू समाज एकवटला होता. पुरुष, महिला, विद्यार्थ्यांचा आंदोलनात मोठा सहभाग होता. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार, पाण्याचा मारा केला. सिमला पोलिसांनी संजौलीमध्ये कलम १६३ तोडल्याप्रकरणी आणि अशांतता निर्माण केल्याप्रकरणी हिंदू जागरण मंचचे अध्यक्ष कमल गौतम यांच्यासह ४००-५०० आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ढाली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये एकूण तीन गुन्हे दाखल केले आहेत.दरम्यान,  या लाठीचार्जच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी आज बंद पुकारला.

शिमल्याची सर्वात प्रसिद्ध बाजारपेठ असलेल्या मॉल रोडवरील बाजार बंद ठेवण्याची घोषणा व्यापाऱ्यांनी केली. व्यापारी मंडळाचे अध्यक्ष संजीव ठाकूर यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत मॉल रोडवरील दुकाने बंद राहतील. तत्पूर्वी, बुधवारी सायंकाळी संजौली येथे झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ दुकानदारांनी तासभर मॉल रोडवरील दुकाने बंद ठेवली होती.

 

Exit mobile version