मराठवाड्यात पावसाने कहर केला आहे. मंगळवारी रात्री ७६ पैकी २७ तालुक्यांना ढगफुटीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सेलू तालुक्यातील निम्नधुदना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी अतिवृष्टी झाल्याने तसेच धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने मंगळवारी रात्रीतून टप्प्याटप्प्यातून बारा दरवाजे उघडले गेले. बुधवारी सकाळी सहा वाजता आणखी दोन दरवाजे उघडून विसर्ग वाढवण्यात आला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत धरणांमधून ३६ हजार ७४० क्युसेक विसर्ग सुरू होता. धरणात पाण्याची आवक जास्त असल्यामुळे विसर्ग चालू राहून दुधना नदीला मोठा पूर आला आहे.
गुरुवार पहाटेपासून सेलू- देवगाव फाटा- औरंगाबाद हा राष्ट्रीय महामार्ग मोरेगाव येथील जुन्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतुकीसाठी बंद असणार आहे. धरणातील पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. अंतर्गत रस्ते, जोडरस्त्यावरील कमी उंचीच्या पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे ५५ हून अधिक गावांचा सेलू शहराशी संपर्क तुटला आहे.
हे ही वाचा:
भारत विरुद्ध इंग्लंड एक दिवसीय आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक जाहीर
बारमेरमध्ये भारतीय हवाई दलाचा ‘हा’ नवा विक्रम
अरबी समुद्रात नौकानयनपटूंनी भरली शिडात हवा
…म्हणून नवऱ्याने आपल्या दोन महिन्यांच्या मुलीला टाकून दिले!
मराठवाड्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला. या पुरामुळे १२ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. यात पैठण तालुक्यात घराची भिंत एका महिलेच्या अंगावर पडल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. पुरात वाहून गेल्याने औरंगाबाद, परभणी, जालना, हिंगोली आणि बीडमध्ये प्रत्येकी एक तर नांदेडमध्ये चार आणि लातूरमध्ये दोन नागरीकांचा मृत्यू झाला आहे. मराठवाड्यात १ सप्टेंबरपासून पावसामुळे ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. पुराच्या पाण्यात नागरिकांसह जनावरेही वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. पुरामध्ये २३ जनावरे वाहून गेली असून २३ घरांची पडझड झाली आहे.
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातील धरणे भरली आहेत. चोखासागर प्रकल्पाचे १९ तर यवतमाळमधील बेंबळाचे १६ दरवाजे खोलण्यात आले आहेत. त्याचबरोबर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. १९ लघु पटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तीन मोठ्या व सात मध्यम प्रकल्पात जलसाठा वाढला आहे. पावसामुळे पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सर्वेक्षणाची मागणी केली जात आहे.