मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे. सोमवार, २१ फेब्रुवारी रोजी ते केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किसन रेड्डी आणि राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांची भेट घेणार आहेत.
मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली एक जनअभियान सुरू करण्यात आले आहे. या जनअभियानात सर्व क्षेत्रांतील मान्यवर एकत्र आले असून या अभियानात सहभागी झाले आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतचा प्रश्न गेली अनेक वर्षे केंद्राकडे प्रलंबित आहे. त्यासाठी आता राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा सुरू केला आहे. हा प्रश्न आता अंतिम टप्प्यात आला आहे. तो मार्गी लावण्यासाठी सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आजसोमवारी केंद्रीय मंत्र्यांना भेटणार आहे. या शिष्टमंडळात प्रधान सचिव भूषण गगराणी आणि लेखक-दिगदर्शक श्रीरंग गोडबोले यांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
न्यायालयाच्या बाहेर वाहनांमध्ये बसून नोटरी व्यवसाय नको!
मिठागराच्या जमिनीवर सेना आमदार उभारणार थीम पार्क?
तेलंगणाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना का भेटत आहेत?
ठाकरे-राव भेट! तिसऱ्या आघडीच्या उचक्या पुन्हा सुरु
२७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन आहे आणि त्याआधी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, अशी आग्रही मागणी असून दिल्लीतील मराठी नेतेमंडळी आणि अधिकारी ह्यांची भेट घेणार असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले. तसेच आवश्यकता भासल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनाही दूरध्वनीवरून विनंती करणार असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री जी. किसन रेड्डी आणि राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील नामवंत लेखक, विचारवंत आणि मराठी कलाकार अशा अनेक मान्यवरांची स्वाक्षरी असलेले विनंतीपत्र देण्यात येणार आहे. सध्या देशातील सहा भाषांना अभिजात दर्जा मिळाला आहे. तमिळ (२००४), संस्कृत (२००५), तेलुगु (२००८), कानडी (२००८), मल्याळम (२०१३) आणि उडिया (२०१४).