मराठी, हिंदी, गुजराती चित्रपट, नाट्यक्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे शनिवारी वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने प्राणज्योत मालवली.
सोज्वळ चेहरा आणि तशाच प्रकारच्या भूमिकांसाठी वत्सला देशमुख ओळखल्या जात. ‘पिंजरा’ या चित्रपटात आक्का या खलनायकी छटा असलेली भूमिका त्यांनी साकारली होती. त्या भूमिकेसाठी त्यांच्या नावाची खूपच चर्चाही तेव्हा झाली होती पण नंतर त्यांना अशा कोणत्याही खलनायकी भूमिका मिळाल्या नाहीत. त्याआधी त्यांनी केलेल्या भूमिका या प्रेमळ आई, बहीण, वहिनी अशा स्वरूपाच्याच होत्या.
वस्तला देशमुख यांनी चित्रपटक्षेत्रात स्वतःच्या भूमिकांच्या जोरावर एक ठसा उमटविला पण वैयक्तिक आयुष्यात त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यांची कन्या रंजना देशमुख यांना अपघात झाला आणि त्यानंतर त्यांना अपंगत्व आले. त्यानंतर तारुण्यातच त्या स्वर्गवासी झाल्या. त्याचे मोठे दुःख वत्सला देशमुख यांना होते. त्यांची अन्य दोन मुलेही कमी वयात मृत्युमुखी पडल्यामुळे त्या खचत गेल्या.
इतिहाससंशोधनात रस घेणारे चंदन विचारे यांनी मार्चच्या पहिल्या आठवड्यात वत्सला देशमुख यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती आणि त्यांच्याशी गप्पा मारल्या होत्या. त्यासंदर्भात सोशल मीडियावरील पोस्टमधील काही भाग-
एकेकाळी मराठी , हिंदी, गुजराती नाटक आणि सिनेमांत चरित्र अभिनेत्री, सहाय्यक अभिनेत्री म्हणून अभिनय केलेल्या , नाट्य- चित्रपटसृष्टी गाजवलेल्या या गौरवर्णी , तेजःपुंज वत्सलाजी वयाच्या ९२ व्या वर्षातही तितक्याच सुंदर दिसतात अन् बोलतातही. माझे परिचित राम धुरी यांच्यासमवेत मी त्यांच्या निवासस्थानी गेलो. दारावर लाल रंगात वत्सला देशमुख नावाची पाटी होती. दारावरची बेल वाजवताच आजींचे नातू आणि सुप्रसिद्ध रायफल शूटर श्री. चेतन देशमुख यांनी दरवाजा उघडला. आत शिरतो न शिरतो तोच नजरेसमोर एक जुनं लाकडी शोकेस, त्यातल्या कप्प्यांत बरेचसे पुरस्कार अन् शोकेसच्या मधोमध मराठी चित्रपटसृष्टीला पडलेलं एक साजिरं गोजिरं स्वप्न म्हणजेच अभिनेत्री कु. रंजना देशमुख हिची फोटोफ्रेम. त्या अभिजात सौंदर्यालचं मी डोळे भरुन दर्शन घेतलं अन् मग ओळख परिचय वगैरे सोपस्कार आटोपून मी सुरुवात केली वत्सला आजी आणि त्यांच्या नातवासोबत गप्पांना.
नावाप्रमाणेच वात्सल्यमूर्ती असलेल्या वत्सला देशमुख यांचा जन्म २२ ऑगस्ट १९३० रोजी महाडमधील वरदोळी (आताचे नाते) गावात लक्ष्मीबाईंच्या पोटी झाला. वडील श्रीधरपंतांना स्वप्नात दृष्टांत झाल्याने त्यांनी गावात एक शंकराचं मंदिर बांधल्याचं वत्सला आजींचा नातू चेतन यांनी सांगितलं आता मात्र त्या गावात आमचं घर वगैरे काहीच नाही असंही ते म्हणाले. श्रीधरपंत देशमुख हे बापूराव पेंढारकर यांच्या ललितकलादर्श या नाटक कंपनीत लहान मोठ्या भुमिका करत असत. त्यावेळी फिरती नाटक कंपनी असल्याने आईवडीलांसोबतच वत्सलाजी आणि त्यांची तीन भावंड – मोठा भाऊ कमलाकांत देशमुख, तिसऱ्या संध्या ( खरे नाव विजया, व्ही. शांताराम यांच्या तृतीय पत्नी ), चौथी लीला देशमुख ( बाळासाहेब ठाकरे यांचे चुलत बंधू विनायक ठाकरे यांच्या पत्नी ) असं भावंडांचं बिऱ्हाड या गावातून त्या गावात फिरत असे. कालांतराने नाटके चालेनाशी झाल्याने वडील श्रीधरपंत यांनी संसाराचा गाडा चालू ठेवण्यासाठी काही काळ मुंबईच्या श्रीराम मिलमध्ये नोकरी करणं पसंत केलं. वडील मुंबईत स्थिरस्थावर होईस्तोवर आई आणि ही चार भावंडे नाशिकला रहात होती. वडील मुंबईत स्थिरस्थावर झाल्यानंतर हे सगळे मुंबईत भुलेश्वर येथे आले. त्यावेळी मुंबईत होणाऱ्या मेळ्यांमध्ये वत्सला व संध्या या दोघी बहिणी गाणी गायच्या. त्यावेळी वत्सलाजी आठ वर्षांच्या होत्या. गायिका सुलोचना चव्हाण यांच्यासोबत त्यांची चांगली मैत्री.
बडोद्यात असताना तेथील लक्ष्मीकांत नाटक समाज आयोजित वीरपत्नी या गुजराती नाटकात त्यांनी काम केले त्याचे काही प्रयोगही झाले. बऱ्याचशा गुजराती नाटकातूनही वत्सलाजींनी काम केले. परंतु वडीलांची इच्छा हिच होती कि त्यांनी मराठी नाटकात काम करावे. योगायोगाने नानासाहेब फाटक यांच्यासोबत राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकात मदालसा ही भूमिका त्यांना मिळाली. या नाटकाचा पहिला प्रयोग परळच्या दामोदर नाट्यगृहात झाला होता. राक्षसी महत्त्वाकांक्षानंतर रणदुदुंभीत- सौदामिनी, त्राटिका नाटकात त्राटिकेची, हॅम्लेटमध्ये राणी, संगीत संशय कल्लोळमध्ये कृत्तिका, खडाष्टकमध्ये ताराऊ, बेबंदशाहीत येसूबाई, रायगडाला जेव्हा जाग येतेमध्ये सोयराबाई, सौभद्रमध्ये रुक्मिणी, झुंजाररावमध्ये कमळजा – शारजा , शिक्काकट्यारमध्ये राणी ताराबाई, शिवसंभवमध्ये जिजाबाई अशा विविधरंगी भुमिका त्यांनी अगदी सहज साकार केल्या नुसत्याच साकार नाही तर चिरस्मरणीय करुन ठेवल्या. मराठी, हिंदी, गुजराती अशा तिनही नाट्य चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयकौशल्याच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली.
नाटकांसोबतच त्यांनी मराठी हिंदी चित्रपटांतही काम केले. त्यांचा पहिला हिंदी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक ईश्वरलाल यांचा जय शंकर. यात त्यांनी रावणाच्या आईची भुमिका साकारली होती. या चित्रपटाची एक गमतीदार आठवण अशी कि, वत्सलाजी या त्यांच्या लहानग्या तीन/ चार महिन्यांची असलेल्या मुलगी रंजना हिस सोबत घेऊन जात. त्या चित्रपटात चित्रीकरणासाठी एका लहानग्या मुलीच्या भुमिकेसाठी सेटवरील लोकांनी रंजनाला घ्यावे म्हणून हट्ट धरला. लोकाग्रहास्तव त्यांनी छोट्या रंजनाला हातात घेतले तेव्हा ती झोपली होती पण लाईट, साऊंड, एक्शन अशी घोषणा होताच छोट्या रंजनाने डोळे उघडले. हिच तिची चित्रपटसृष्टीतली पहिली एन्ट्री अन् पुढचं आपण सारे जाणताच. रंजनाने या क्षेत्रात येऊ नये अशी वत्सलाजींची इच्छा होती पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. रंजनाने खूप शिकून अन्य क्षेत्रात आपले नाव कमवावे असे वत्सलाजींना वाटे.
हे ही वाचा:
देवेंद्र फडणवीसांची चौकशी सुरु
बॉक्स ऑफिसवर ‘द काश्मीर फाइल्स’ची कोटींची कमाई!
इराणने इराकमधील अमेरिकेच्या दूतावासावर डागले क्षेपणास्त्र
‘राज्यात नोटीस देण्याची परंपरा नव्हती’ अजित पवारांचा घरचा आहेर
वत्सलाजींनी गोरधनदास भाटी यांच्यासोबत आंतरजातीय विवाह केला होता. गोरधनदास भाटी हे मूळचे जैसलमेरचे रजपूत आणि वत्सलाजी या सीकेपी. गोरधनदास यांचाही नावलौकिक मोठा. त्यांना गुजरातचे बालगंधर्व म्हटलं जाई.
या दोघांच्याही संसारवेलीवर तीन अपत्ये जन्मास आली. कालांतराने वत्सलाजी आणि गोरधनदासजी विभक्त झाले आणि मग वत्सलाजी परळच्या भाना मेन्शन या इमारतीत रहायला आल्या. प्रेमळ स्वभावाच्या या वत्सल माऊलीला वैयक्तिक आयुष्यात अनेक धक्के पचवावे लागले. रंजनाजींना झालेला अपघात , त्या अपघातातून आलेलं कायमस्वरुपी अपंगत्व आणि मग मृत्यू त्याचबरोबर मोठा मुलगा नरेंद्र देशमुख हा वयाच्या ५० व्या वर्षी तसेच धाकटा मुलगा श्रीकांत देशमुख याचेही वयाच्या ३० व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले. या सगळ्या एकामागोमाग एक झालेल्या आघातातून त्यांनी स्वतःला सावरलं. सुरुवातीला त्या खचल्या पण यातून हळूहळू सावरल्या. राक्षसी महत्त्वाकांक्षा नाटकातील मदालसा भुमिकेदरम्यान प्रेक्षकांतून त्यांच्या दिशेने भिरकावलेली चप्पल ही त्या भूमिकेला मिळालेली दाद होती असं त्या म्हणतात.