वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर अद्याप फरार असून तिचा शोध सुरु आहे. पूजा खेडकरांचे अनेक कारनामे समोर आल्यानंतर त्यांच्या भरतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाला. बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे यूपीएससीची परीक्षा देऊन अधिकारी झाल्याचे समोर आले. याचा तपास सध्या सुरु आहे. दरम्यान, राज्यात झालेल्या एमपीएससी परीक्षेत देखील अनेक विद्यांर्थ्यांनी पूजा खेडकर यांच्या सारख्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या फॉर्म्युलाचा वापर केल्याचे समोर आले आहे. यांच्या भरतीवर संशय व्यक्त केला जात असून या सर्व उमेदवारांची शारीरिक तपासणी नव्याने करण्याचे आदेश ‘महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण’ अर्थातच ‘मॅट’ने एमपीएससीला दिले आहेत.
येत्या दोन दिवसात या सर्व उमेदवारांच्या नव्याने शारीरिक चाचण्या होणार आहेत. २०२२ मध्ये एकूण ६२३ पदांसाठी एमपीएससीने परीक्षा घेतली होती. यातील १० जागा या दिव्यांगांसाठी राखीव होत्या. यातील १० पैकी ९ उमेदवारांचे दिव्यांग प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. याच जागांवर ‘बोगस’ दिव्यांगांनी प्रवेश मिळवला का? याची चाचपणी आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग करत आहे. यात संशय असलेल्या उमेदवारांची शारिरीक व्यंगाची नव्याने चाचणी करून त्याचा अहवाल ५ ऑगस्टपूर्वी मॅट आणि एमपीएससीकडे सादर करावा लागणार आहे.
हे ही वाचा:
उरण हत्याकांडमधील मुख्य आरोपी दाऊदचा शोध पोलिसांनी कसा घेतला?
उद्धव ठाकरेंनी मराठा आंदोलकांकडे ढुंकूनही पाहिले नाही; आंदोलक भडकले !
विक्रमवीर विश्वेश लेले यांचा गौरव !
नवाब मालिकांना उच्च न्यायालय निकाल देईपर्यंत वैद्यकीय जामीन मंजूर
पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा सर्व चाचण्या पूर्ण करून १८ जानेवारी २०२४ रोजी एमपीएससीने या भरतीची तात्पुरती निवड यादी जारी केली होती. मात्र या संपूर्ण यादीत दिव्यांग कोट्यातून लागलेल्या उमेदवारांबद्दल अनेक तक्रारी एमपीएससीकडे पुराव्यांसह करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे पूजा खेडकर प्रमाणे विद्यार्थ्यांचे कारनामे समोर येतील का? याकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे.