जुलैमध्ये मुंबई आणि जवळच्या उपनगरांना मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसला होता. मुंबईतील मुसळधार पावसानंतर शहरातील मुख्य आणि अंतर्गत मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडी, अपघात आणि मणक्याचे आजार अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहरातील रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे हे नागरिकांसाठी समस्या ठरत आहेत.
केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या अहवालानुसार २०१६ ते २०१९ या वर्षांमध्ये मुंबईत एकूण १० हजार ७६ प्रवाशांचा खड्ड्यांमुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत दिवसाला सहा मृत्यू हे खड्ड्यांमुळे होत असतात असेही अहवालात म्हटले आहे. २०१९ मध्ये २ हजार १४० नागरिकांचा खड्ड्यांनी बळी घेतला असून ही संख्या २०१८ या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यानंतर रस्त्यांची अवस्था वाईट असते.
शहरातील अंतर्गत मार्गांवर खड्डे आहेतच, पण मुख्य मार्ग आणि उड्डाणपुलांवरही मोठ्या संख्येने खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील पेव्हर ब्लॉक उखडून खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक अपघात होत आहेत. रस्त्यावर डांबरमिश्रित खडी पसरल्यामुळे दुचाकीस्वारांना अधिक काळजीपूर्वक आपले वाहन चालवावे लागत आहे.
हे ही वाचा:
दिल्लीतील हज हाऊसला स्थानिकांचा विरोध
लोकलबंदीमुळे बेस्टने उचलला प्रवाशांचा भार
धक्कादायक! गर्भपिशव्या काढण्याचा इथे सुरू आहे धंदा
जम्मू- काश्मिरमध्ये अनेक ठिकाणी एनआयएची छापेमारी
शिव – भायखळा मार्गावरील परेल पुलावर सर्वाधिक खड्डे असून लालबाग, भायखळा, भांडूप, घाटकोपर, विक्रोळी, सांताक्रुझ, अंधेरी आणि वांद्रा येथील रस्त्यांचीही वाईट अवस्था आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील मुलुंड चेकनाका परिसरातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून नागरिकांनी तक्रार केली आहे.