मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने आपल्या घोषणेनुसार व्हेरिफाईड अकाऊंट्सवरून मोफत ब्लू टिक्स काढून टाकन्यास सुरुवात केली आहे.. ज्यांनी ब्लू टिक प्लॅनसाठी पैसे दिले नाहीत त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टिक्स काढून टाकण्यात आल्या आहेत. एलन मस्कने १२ एप्रिल रोजीच लेगसी व्हेरिफाईड खात्यातून ब्लू टिक काढून टाकण्याची घोषणा केली होती.
व्हेरिफाईड अकाउंटमधून २० एप्रिलपासून लीगेसी ब्लू टिक मार्क काढून टाकले जाईल. ब्लू टिकची आवश्यकता असेल तर दरमहा पैसे मोजावे लागतील असे एलन मस्क यांनी सांगितले होते. एलन मस्क यांच्या घोषणेनंतर ट्विटरची नवीन प्रणाली लागू होताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सलमान खान, शाहरुख खान यांच्यासह सर्व सेलिब्रिटींच्या ब्ल्यू टिक्स हटवण्यात आल्या आहेत.
ट्विटरने अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर , विराट कोहली यांच्या ब्लू टिक्सही हटवल्या आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, बसपा प्रमुख मायावती, भाजप प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी यांच्यासह अनेक दिग्गजांच्या ट्विटर अकाउंटवरून ब्लू टिक्स काढण्यात आल्या आहेत.
क्रिकेटपटू विराट कोहली, रोहित शर्मा , महेंद्रसिंग धोनी आणि स्मृती मानधना यांसारखे प्रमुख खेळाडू देखील यामध्ये आहेत. त्याचबरोबर अरविंद केजरीवाल, एमके स्टॅलिन, ममता बॅनर्जी यांच्यासह मुख्यमंत्री आणि प्रमुख विरोधी राजकारणी यांनी देखील ब्ल्यू मार्क मार्क गमावले आहेत.
आम आदमी पार्टी , ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस, सीपीआय(एम) आणि डीएमके यांसारख्या काही राजकीय पक्षांच्या ट्विटर प्रोफाइलवरही परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी ए लॉन मस्क यांनी अधिग्रहण करण्याच्या आधी ट्विटरने पत्रकार, अभिनेते, राजकारणी अशा मोठ्या व्यक्तींच्या अकाऊंटची पडताळणी केली होती. यापूर्वी ट्विटर कोणतेही पैसे न घेता ब्लू टिक्स मोफत देत असे. बॅच एक स्टेटस सिम्बॉल बनतो असे सांगून मस्क यांनी ट्विटरवर कोणाचीही कमीत कमी शुल्कामध्ये पडताळणी करण्यात यावी अशी इच्छा व्यक्त केली होती.
ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शनची काय आहे किंमत
ट्विटर ब्ल्यूची किंमत देशानुसार बदलते. अमेरिकेत त्याची किंमत आयओएस किंवा अँड्रॉइड युजर्ससाठी प्रति महिना ११ डॉलर किंवा ११४. ९९ डॉलर प्रति वर्ष आणि वेब वापरकर्त्यांसाठी ८ डॉलर प्रति महिना किंवा ८४ डॉलर प्रति वर्ष आहे. भारतात आयओएससाठी ट्विटर ब्ल्यूची किंमत मासिक ९०० रुपये आहे, वेबसाठी मासिक ६५० रुपये आहे तर आयओएससाठी वार्षिक किंमत ९,४०० रुपये आहे. अँड्रॉइड युजर्ससाठी, मासिक किंमत ९०० रुपये आहे तर वार्षिक किंमत ९,४०० रुपये आहे.