भारताची पिस्तुल नेमबाज मनू भाकर हिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई केली आणि इतिहास रचला. २०१२नंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत प्रथमच पदक मिळाले आहे. त्यामुळे मनूच्या या कामगिरीला महत्त्व प्राप्त होते. तिला या कामगिरीनंतर पत्रकारांनी जेव्हा विचारले तेव्हा त्यामागे भगवद्गीता असल्याचे तिने अभिमानाने सांगितले.
२२ वर्षीय मनूने २२१.७ गुण मिळवत अंतिम फेरीत दमदार कामगिरी केली. आठ खेळाडूंच्या या अंतिम फेरीत तिने कांस्य जिंकले. पहिल्या तीन खेळाडूंत स्थान मिळविण्यासाठी तिला बराच संघर्ष करावा लागला. पण अखेर तिने हे यश मिळविले.
पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर मनू म्हणाली की, भगवद्गीतेमुळे मी प्रभावित झालेली आहे. अंतिम फेरीत मला त्यातील मार्गदर्शक तत्त्वे आठवत होती. तुला जे काही करायचे आहे ते कर. त्यातून हाती काय लागेल, याचा विचार करू नको, हे मी लक्षात ठेवले होते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते की, तुझ्या कर्मावर तू लक्ष केंद्रित कर. त्यातून काय निष्पत्ती होईल, त्याकडे तुझे लक्ष नको. तेच माझ्या मनातही सुरू होते. त्याप्रमाणे मी माझ्या क्षमतेनुसार खेळत गेले. बाकी विचार केला नाही.
हे ही वाचा:
नेमबाज मनू भाकरने रचला इतिहास, कांस्य पदकावर कोरले नाव !
दिल्लीत कोचिंग सेंटरच्या तळघरात साचलेल्या पाण्यात तीन विद्यार्थी बुडाले !
सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार!
विधानपरिषदेतील नवनिर्वाचित ११ उमेदवारांनी घेतली शपथ !
२०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरचे पिस्तुल खराब झाले होते. त्यामुळे तिची कामगिरीही ढासळली. पण त्यातून सावरलेल्या मनूने यावेळी मात्र आपल्या कामगिरीची छाप पाडली. कोरियाच्या दोन खेळाडूंच्या तोडीसतोड कामगिरी करत तिने तिसरे स्थान मिळविले.
या पदकामुळे भारताचे खाते उघडले आहे. नेमबाजीत भारताला ऑलिम्पिक पदक जिंकून देणारी मनू ही पहिली भारतीय नेमबाज ठरली आहे.