महाराष्ट्रात कोसळत असलेल्या पावसाचा कहर सर्वत्र दिसू लागला आहे. गावेच्या गावे पाण्याखाली जात आहेत. पालघर, डहाणू या भागात पावसाचे थैमान पाहायला मिळते. पालघर तालुक्यातील मनोर गाव पाण्याने वेढले गेले आहे.
या गावाजवळून नदी अगदी जवळून वाहते. १९९८मध्ये तिथे पूर आला होता. तेव्हा ८ ते १० फूट पाणी मनोर गावात होते. आता तेवढे नसले तरी पाणीच पाणी आहे. यासंदर्भात अभय दारुवाले यांनी माहिती दिली की, दोन दिवस प्रचंड पाऊस आहे. हायवेला असलेल्या मस्तान नाका परिसरातही पाणी भरले आहे. पालघर बोईसर नवे कलेक्टर ऑफिसजवळही पाणी आहे. सूर्या धरणामुळे इथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. प्रचंड पाऊस, समुद्राची भरती ओहोटीची वेळ, धरणातून सोडलेले पाणी अशा सगळ्याचा फटका बसला आहे.
मनोर गावातून वाहने जाणेच शक्य नाही. पण कंबरभर पाण्यातून लोकांना वाट काढावी लागते. वैतरणा नदीही तुडुंब भरून वाहते आहे. पाण्यामुळे इतस्ततः कचराही मोठ्या प्रमाणावर वाहून आला आहे.
हे ही वाचा:
महिला डेंटिस्टकडे खंडणी मागणाऱ्या एकाला बेड्या
अकरावीच्या सीईटी प्रवेशात संकेतस्थळ नापास
ऑलिंपिकच्या उद्घाटनाची प्रतीक्षा… भारतीय खेळाडू सज्ज!
एनडीआरएफच्या तुकड्या इथे आलेल्या आहेत. बचावकार्य सुरू केले आहे. इथे दरवर्षीच प्रचंड पाऊस पडतो त्यामुळे अशी परिस्थिती ओढवते. पूर्वी मासवणच्या इथे सूर्या नदीजवळचा पूल पाण्याखालीच आहे. त्यामुळे संपर्क तुटलेला आहे. दुकाने, घरे यांना या पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला असून सगळे व्यवहार ठप्प झाले आहेत. पाऊस थांबलेला नसल्याने आणखी किती काळ ही परिस्थिती कायम राहणार याची चिंता लोकांना लागून राहिलेली आहे.