‘इंडियाज गॉट टॅलेंट’मध्ये चमकलेल्या मल्लखांबप्रेमी मनोज प्रसादच्या टीमला सहा लाख

शोचे जज बादशहा, किरण खेर यांनी दिला मदतीचा हात

‘इंडियाज गॉट टॅलेंट’मध्ये चमकलेल्या मल्लखांबप्रेमी मनोज प्रसादच्या टीमला सहा लाख

छत्तीसगडच्या अबुझमाड या नक्षलवादी भागात सशस्त्र दलात कमांडो म्हणून काम करणाऱ्या मनोज प्रसादने आपल्या मेहनतीने तिथे मल्लखांब रुजविला आणि आता त्याच्या देखरेखीखाली तयार झालेल्या छोट्या मल्लखांबपटूंना इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये स्थान मिळाले. एवढेच नव्हे तर त्यांनी या शोमध्ये उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. अत्यंत कमी साधने उपलब्ध असतानाही त्यांनी घेतलेल्या या मेहनतीमुळे या शोचे जज गायक बादशहा आणि अभिनेत्री किरण खेर प्रभावित झाले आणि त्यांनी चक्क सहा लाखांची मदत या टीमला केली आहे.

 

२ ऑक्टोबरला या शोच्या शूटिंगदरम्यान मनोज प्रसाद आणि त्याच्या टीमने जी मेहनत घेतली, ज्या अत्यंत दुर्गम भागातून येत त्यांनी या शोमध्ये झेप घेतली ती पाहून त्यांच्या साधमसामुग्रीसाठी त्यांनी ही मदत देऊ केली आहे. त्या सहा लाखांच्या रकमेचा धनादेशच मनोज प्रसाद, पारस आणि त्यांच्या टीमच्या हाती सोपविण्यात आला.

हे ही वाचा:

सिक्किममध्ये पुरामधून वाहून आलेला तोफगोळा फुटला

भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनचे पहिले सुवर्ण

इस्रायलच्या महिलेला हमासच्या अतिरेक्यांनी मारले; व्हीडिओमुळे संताप

‘डाव्या कट्टरवादाचे दोन वर्षांत उच्चाटन’

 

यावेळी बोलताना बादशहा म्हणाला की, अबुझमाड येथील नारायणपूर याठिकाणी मी भेट देईन. तुम्ही जी मेहनत घेत आहात ती पाहण्यासाठी मी तिथे येईन. सोनी टीव्हीवर हा कार्यक्रम सुरू असून त्यात मनोज प्रसाद आणि त्यांच्या या टीमने जबरदस्त कामगिरी करत देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.

 

 

इंडियाज गॉट टॅलेंटच्या १०व्या सिझनमध्ये त्यांची टीम सहभागी झाली होती. या शोसाठी १४ टीमची निवड केली गेली. त्याती ८ टीम शिल्लक राहिल्या असून त्यात मनोज प्रसाद याच्या टीमचाही समावेश आहे.

 

मनोज प्रसादच्या या टीममध्ये स्वतः मनोज प्रसाद, पारस यादव, नरेंद्र गोटा, फुल सिंह, युवराज सोम, राकेश, राजेश कोर्राम, राजेश सलाम, मोनू नेताम, श्यामलाल पोटाई, सुरेश पोटाई, समीर शोरी, अजमद फरिदी, शुभम पोटाई यांचा समावेश आहे. अत्यंत दुर्गम भागात राहात असलेली ही मुले आदिवासी पाड्यातील आहेत, पण प्रचंड इच्छाशक्ती आणि गुणवत्ता यांच्यापाशी आहे. त्यांच्या या गुणवत्तेला आकार देण्याचे काम मनोज प्रसादने केले. मुख्य म्हणजे मनोज प्रसादच्या या आतापर्यंतच्या वाटचालीत महाराष्ट्राचेही योगदान आहे.

 

 

महाराष्ट्रात मुंबईच्या मध्यभागी असलेल्या दादरमधील श्री समर्थ व्यायाम मंदिरात शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते उदय देशपांडे यांनी मनोज प्रसादला २०१७मध्ये मल्लखांब शिकविला. तेव्हा तो कमांडो असतानाही इथे येऊन त्याने मल्लखांबाचे धडे गिरवले आणि त्या मल्लखांबाची शिकवण घेऊन तो छत्तीसगडला पोहोचला. तिथे त्याने लहान लहान मुलांसाठी मल्लखांब तयार केले आणि त्यावर त्यांनाही मल्लखांबाचे धडे दिले. आज अशी अनेक मुले त्याने तिथे तयार केली. प्रसंगी त्याने आपल्या घरात त्यांना आसरा दिला. कोरोनाच्या काळात ही मुले आपापल्या घरी निघून गेली होती. ती पुन्हा गोळा करणे, त्यांना पुन्हा मल्लखांबाकडे वळवणे, त्यासाठी त्यांच्या पालकांशी संवाद साधणे हे काम मनोज प्रसादने अत्यंत जिद्दीने केले. आज त्याच्या मल्लखांब अकादमीत १०० पेक्षा अधिक मुले आहेत. त्यांचा खर्च तोच करतो. पण तो पुरेसा नाही. आपल्या पगारातून तो या मुलांची देखभाल करतो. अनेक मल्लखांब स्पर्धांमध्येही तो सहभागी होऊन या खेळाचा प्रसार-प्रचार करतो. आता या शोच्या उपांत्य फेरीत त्याची टीम पोहोचली आहे. त्यांना देशाने पाठबळ द्यावे अशी विनंती त्याने केली आहे.

Exit mobile version