मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात परदेशी यंत्रणांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे (निवृत्त)यांन व्यक्त केले आहे. अनेक दशकांपासून ईशान्येकडील विविध बंडखोर गटांना चीनकडून मदत केली जाते, याचा दाखला त्यांनी दिला.
“मणिपूरमध्ये आणि शेजारील राष्ट्र म्यानमारमध्ये असणारी अस्थिरता आपल्या एकंदरित राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक आहे. अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे,’ असे जनरल नरवणे यांनी सांगितले. शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या एका कार्यक्रमात संघर्षग्रस्त मणिपूरमधील परिस्थितीवरील प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी या बाबींकडे लक्ष वेधले. ‘मला खात्री आहे की, जे सध्या पदावर आहेत आणि ज्यांच्यावर संपूर्ण मोहिमेची जबाबदारी आहे, ते ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत काय करायचे असते, हे त्या वेळी प्रत्यक्ष अशा संकटाचा किंवा समस्येचा सामना करणाऱ्याला पुरेपूर माहीत असते,’ असेही ते म्हणाले.
चीन अनेक दशकांपासून ईशान्येत बंडखोरीला खतपाणी घालत आहे. त्यामुळे परकीय यंत्रणांचा सहभाग या संघर्षात नाकारता येत नाही. विशेषत: विविध बंडखोर गटांना चीन वेळोवेळी मदत करते, असे आढळून आले आहे, असे त्यांनी नमूद केले.
सात जणांची सीबीआय करणार चौकशी
४ मे रोजी मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात जमावाने दोन महिलांवर केलेल्या कथित लैंगिक अत्याचाराचा तपास सीबीआयने औपचारिकपणे हाती घेतला आहे. या अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने देशात खळबळ माजली होती. सीबीआय आता मणिपूर पोलिसांनी पकडलेल्या सात संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची नव्याने चौकशी करणार आहे. सात जणांच्या अटकेची माहितीही गृह मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयाला दिली. एफआयआरमध्ये अपहरण, सामूहिक बलात्कार, हत्या आणि संबंधित कलमे आहेत. उपमहासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक इंफाळमध्ये तैनात करण्यात आले आहे.